गगनबावडा / प्रतिनिधी दि. २२
गगनबावडा तालुक्यातील हिरवाईने नटलेला परिसर म्हणजे पळसंबे येथील रामलिंग गुहा आणि मंदिर होय. पावसाळ्यात आकर्षक धबधबा, हिवाळ्यात धुके, उन्हाळ्यात थंड हवेचे ठिकाण अशा तिन्ही ऋतूमध्ये निसर्गप्रेमींचे आवडते ठिकाण बनले आहे. पांडवकालीन लेणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या रामलिंगमधील अखंड शिळेमध्ये असलेले मंदिर वैशिष्टपूर्ण असून, गुहा गारवाही देते. कोल्हापूर शहरापासून ४२ कि. मी. अंतरावर गगनबावडा रोडवर पळसंबे गावापासून दक्षिणेकडे ३ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे. बाहेर थांबल्यानंतर या ठिकाणची कल्पनाही येत नाही. येथे केवळ हिरवीगार झाडे दिसतात. गावकऱ्यांनी मात्र या पर्यटनस्थळाला अद्याप व्यावसायिक रूप दिलेले नाही, हे विशेष. धार्मिक परंपरा असलेल्या या ठिकाणी एकतर शालेय सहली किंवा कौटुंबिक सहलीच भेट देत असतात. मंदिराकडे जाण्यासाठी आता दगडी फरशा लावून वाट केली आहे. पण कोणताही कृत्रिमपणा येथे येणार नाही, याचीही दक्षता घेतली आहे. पावसाळ्यात सह्याद्रीच्या रांगातून कोसळणारे अनेक धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची पावले वळतात. रामलिंगचा धबधबा सुरक्षित आणि पावित्र्य जपलेला असा आहे. हा धबधबा ८-१० फुटांवरून कोसळत असल्याने पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. पुरातत्व खात्याच्या माहितीनुसार ही बुध्दकालीन लेणी असल्याचे बोलले जात आहे; पण स्थानिक नागरिकांनी मात्र याला पांडवकालीन गुहेचा दर्जा देत प्रार्थनास्थळच ठेवले आहे. अज्ञातवासात पांडवांनी या ठिकाणी तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते.
फोटो पळसंबे (ता. गगनबावडा) येथील रामलिंग मंदिर आणि गुहेतील शिवलिंग.