कोल्हापूर : राज्य व केंद्रातील भाजपप्रणीत सरकारच्या धोरणामुळे सामान्य माणूस दिवसेंदिवस अडचणीत येऊ लागला आहे. सामान्य माणसाला दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यालयात रोज तीन तास विविध सेलचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत. याबाबत खुद्द पक्षाचे नेते अजितदादा पवार यांनी आदेश दिल्याने राष्ट्रवादीची यंत्रणा सक्रीय झाली आहे. राज्यातील जनतेने कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसला तब्बल पंधरा वर्षे सत्ता दिली, पण सत्तेत असताना पक्षाची सामान्य माणसांशी असणारी नाळ तुटत गेली आणि त्याचे परिणाम लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दिसले. याबाबतचे चिंतन राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पुणे येथील मेळाव्यात झाले. आगामी काळात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तळागाळातील लोकांच्या समस्या समजावून घेऊन त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन अजितदादांनी केले आहे. जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी स्थानिक नेत्यांनी संपर्कात राहावेच; पण त्याबरोबर पक्षाच्या कार्यालयात रोज सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत जनतेच्या तक्रारी ऐकून घ्याव्याच्या आहेत. यावेळेत सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, जिल्हा कार्यकारिणी सदस्य हे क्रमानुसार उपस्थित राहतील. या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवताना आमदार, खासदारांबरोबर प्रदेश पातळीवरील नेत्यांची गरज भासल्यास जिल्हाध्यक्षांनी कळवावे. जेणेकरून एखाद्या जटील प्रश्नांबाबत आंदोलन उभे करून सामाजिक प्रश्नाला न्याय देता येईल, असे आदेश अजितदादा पवार यांनी दिल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेस जिल्हा कार्यालयाने त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. (प्रतिनिधी)पक्षाचे नेते अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा कार्यालयात विविध सेलचे जिल्हाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य आठवड्याच्या क्रमानुसार उपस्थित राहणार आहेत. भाजपप्रणीत सरकारच्या शंभर दिवसांच्या कारभाराला जनता वैतागली असून, अशा काळात सामान्य माणसाला आधार देत न्याय देण्याचे काम पक्षाच्यावतीने केले जाणार आहे. तालुका पातळीवरील कार्यालयात हेच काम तालुकाध्यक्ष करणार आहेत. -अनिल साळोखे, जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी कॉँग्रेस
‘राष्ट्रवादी’ची कार्यालये होणार समस्या निवारण केंद्रे
By admin | Updated: February 13, 2015 23:56 IST