कोल्हापूर : ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ योजनेंतर्गत आतापर्यंत ४६ टक्के फेरीवाल्यांना कर्जाचे वितरण करुन कोल्हापूर महानगरपालिकेने राज्यात प्रथम क्रमांकावर आघाडी घेतली आहे. आतापर्यंत ३ हजार १६ लाभार्थ्यांना प्रत्येकी १० हजारप्रमाणे ३० कोटींच्या कर्जाचे वाटप केले आहे.
कोरोना काळात अनेक फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत प्रत्येकी दहा हजार रुपये पतपुरवठा करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील ६ हजार ६१० पथविक्रेत्यांनी अर्ज केले असून, त्यापैकी ४ हजार ३१२ पथविक्रेत्यांच्या प्रकरणांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी ३ हजार १६ लाभार्थ्यांना कर्ज वितरीत करण्यात आले आहे. या योजनेच्या लाभापासून महानगरपालिका क्षेत्रातील एकही पथ विक्रेता वंचित राहू नये, यासाठी महानगरपालिका प्रशासन सर्वतोपरी मदत करेल, असे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.