प्रकाश पाटील कोपार्डे -जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर वाहनमालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक मुकादमांकडून झाल्यानंतर फसवणूक झालेल्या वाहनमालकांनी जाब विचारल्यास त्यांच्यावर पोलिसी गुन्हे दाखल झाले आहेत. न्यायालयात खटले दाखल केले, तर हे खटले संबंधित फसवणूक करणारा मुकादमच उपस्थित राहत नसल्याने वर्षानुवर्षे प्रलंबित असून, काही ऊस वाहतूकदार वाहनमालकांनी आपली जीवनयात्राच संपविली असल्याचे सत्य समोर आले आहे. ‘बुडव्यांना माफी, तर बुडणाऱ्यांना शिक्षा’, असा उफराटा न्याय मिळत असल्याची प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष गणपती देसाई यांनी व्यक्त केली.कोल्हापूर जिल्ह्यात असणाऱ्या साखर कारखान्यांना ऊसपुरवठा करणारी एक यंत्रणा आहे. यात शेतकऱ्यांच्या शेतातील ऊसतोडणी व तो कारखान्यांपर्यंत वाहतूक करणे यासाठी साखर कारखाने वाहनमालकांबरोबर ऊसतोड व वाहतुकीचा करार करतात. त्यासाठी ठराविक रक्कम कारखाने अॅडव्हान्स म्हणून चार जामीन घेऊन देतात. हे वाहनमालक ऊसतोड मजुरांचा पुरवठादार मुकादमाला प्रति कोयता अॅडव्हान्स देतात. यात प्रति कोयता (एक पुरुष व स्त्री अशी जोडी) ७० ते ८० हजार उचल मागितली जाते. एका ट्रक अथवा ट्रॅक्टरसाठी किमान सात ते आठ लाख रुपये बिगर हंगामात उचल मागितली जाते. मजुरांच्या कमतरतेमुळे वाहनमालक ती देतात. बिगर हंगामातील या रकमेचे व्याज वाहनमालकच सोसतो. हंगाम सुरू होताना मात्र अलीकडे अनेक मुकादमांकडून मजूर देण्यात गुंगारा तर दिलाच जातो; पण सात ते आठ लाख रुपयेही बुडविले जात आहेत. जिल्ह्यात हंगाम २०१४/१५ मध्ये अशी ऊसवाहतूक वाहनमालकांची २५ कोटींच्यावर फसवणूक झाल्याचे सत्य समोर आले आहे. तक्रारी करूनही या बुडव्या मुकादमांवर आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. याउलट या बुडव्या मुकादमांना शोधून फसवणूक झालेल्या वाहनमालकांनी जाब विचारल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे फसवणूक झाल्याने कर्जबाजारी झालेल्या जिल्ह्यातील आजपर्यंत आत्महत्या केलेल्या वाहनमालकांची संख्या आठ ते दहांवर पोहोचली आहे. जिल्ह्यात ऊसतोडीसाठी येणारे बहुतांश मजूर हे बीड, उस्मानाबाद, अकोला, पंढरपूर या भागातून येतात. अलीकडे या ऊसतोड मजूर पुरवठ्यासाठी वाहनमालकांकडून अॅडव्हान्स उचलून पसार होणाऱ्या मुकादमांची संख्या वाढत आहे. या फसवणूक झालेल्या वाहनमालकांना कोणतेच कायदेशीर संरक्षण नसल्याने त्यांची कुचंबणा झाली आहे.माझीच ऊसतोड मजूर मुकादमाकडून दहा लाखांची फसवणूक झाली आहे. मी न्यायालयात दाद मागितली आहे. गेली चार ते पाच वर्षे हा खटला गारगोटी न्यायालयात आहे. हा मुकादम न्यायालयात एकाही तारखेला हजर नाही. अलीकडे एका वाहनमालकाला बुडव्या मुकादमाला जाब विचारल्याबद्दल कोठडीची हवा खावी लागली आहे. ऊस वाहतूक करणारे सर्व वाहनमालक हे फक्त शेतकरी आहेत. यात एकही उद्योगपती नाही.- गणपती देसाई, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र ऊस वाहतूकदार ट्रक, ट्रॅक्टरमालक.
फसवणुकीमुळे ऊस वाहतूकदार वाहनमालकांची कुचंबणा
By admin | Updated: May 12, 2015 23:42 IST