कोल्हापूर : विभागीय कार्यालयाकडे चोख काम करीत नाही म्हणून नगरसेवकांच्या तक्रारींमुळे नगररचना विभागात सन्मानपूर्वक बदली केलेल्या उपशहर रचनाकार रावसाहेब चव्हाण यांनी आज स्थायी समिती सभेत सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळल्याने पुन्हा एकदा सदस्यांनी त्यांना धारेवर धरले. सदस्यांच्या प्रश्नांना त्यांनी ‘पाहून सांगतो’,‘मला माहिती नाही’ अशा पद्धतीने चव्हाण यांनी उत्तरे द्यायला सुरुवात केल्याने सदस्य संतप्त झाले. त्यामुळे चव्हाण हे पुन्हा सदस्यांच्या रोषाचे बळी ठरणार की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. राजारामपुरी विभागीय कार्यालयाकडे उपनगर अभियंता म्हणून असलेल्या रावसाहेब चव्हाण यांच्याविषयी स्थायी समिती सदस्यांच्या प्रचंड तक्रारी होत्या. त्यामुळे त्यांची अन्य विभागात बदली करावी म्हणून स्थायी समिती सभाही तहकूब केली होती. सदस्यांचा रोष पत्करलेल्या चव्हाण यांना बदलीला सामोरे जावे लागले. परंतु बदली करताना प्रशासनाने त्यांना काहीशा मोक्याच्या ठिकाणी म्हणजेच नगररचना विभागात उपशहर रचनाकार म्हणून नियुक्ती दिली होती. आजच्या स्थायी सभेत झालेल्या चर्चेत चव्हाण यांना शाहूपुरी पोलीस ठाण्याची इमारत पाडून रस्ता रुंदीकरणाच्या संदर्भातील काम कोठेपर्यंत आले, अशी विचारणा सतीश लोळगे व सभापती सचिन चव्हाण यांनी केली. मात्र यावेळी रावसाहेब चव्हाण यांनी माहिती घेऊन पुढील मिटींगला उत्तर देतो असे सांगितले. साळोखेनगर प्रभागात दवाखाना व अग्निशमन दल उभारण्यासाठी लागणाऱ्या जागेचे संपादन करण्याबाबतही महेश गायकवाड यांनी विचारलेल्या प्रश्नांना रावसाहेब चव्हाण यांनी अशीच बेजबाबदारपणे उत्तरे दिली. त्यामुळे सभापती चव्हाण यांच्यासह महेश गायकवाड, लोळगे व अन्य सदस्यांनी त्यांना धारेवर धरले, आणि बैठकीला येताना माहिती घेऊनच येत चला, अशा शब्दांत सुनावले. वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालत असल्याने चव्हाण यांचा उर्मटपणा गेला नसल्याची भावना सदस्यांची झाली आहे.सुभाषनगरात महापालिकेच्या वतीने व्यायामशाळा बांधण्यात आली असून, ती विनावापर पडून आहे. त्याठिकाणी प्रशिक्षकांची नेमणूक करून व्यायामशाळा तातडीने सुरू करावी, अशी सूचना राजू घोरपडे यांनी केली. विद्युत विभागात तक्रारींचे निरसन होत नसल्याची तक्रार महेश गायकवाड, सुभाष रामुगडे यांनी केली. ठेकेदाराला वर्कआॅर्डर दिलेली नसल्याने दिवे लावण्याचे काम थांबले, असे सदस्य सांगत असताना माजगावकर नावाच्या अधिकाऱ्याने वर्क आॅर्डर दिल्याचे सांगत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त सदस्यांनी माजगावकर सक्षम नसल्याचा ठपका ठेवला. (प्रतिनिधी)
‘रावसाहेब’ अधिकाऱ्यास सदस्यांनी धरले धारेवर
By admin | Updated: September 4, 2014 00:15 IST