शिरोली : शिरोली नगरपालिका करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रालयात कोणत्या कारणासाठी प्रलंबित आहे, याची माहिती घेऊन लवकरच यासंदर्भात बैठक घेऊ, अशी ग्वाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शिरोलीत नगरपालिका मंजूर करण्याचा प्रस्ताव प्रलंबित असून त्यावर निर्णय घेण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, यावर मंत्री शिंदे यांनी बैठकीचे आश्वासन दिले.
गेल्या कित्येक वर्षांपासून शिरोली नगरपालिकेचा प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात पडला आहे. निवेदनात म्हटले आहे की, आजपर्यंत नगरपालिका मंजुरीबाबतीत फक्त आश्वासनेच मिळाली आहेत. शिरोलीनंतर हुपरी, शिरोळ, हातकणंगले या नगरपालिका स्थापन झाल्या आहेत. शिरोली हे सध्या ४२ गावांसह प्राधिकरणात आहे. पण या प्राधिकरणाचा कोणताच फायदा झाला नसल्याची भावना शिरोलीकरांमध्ये आहे. शिरोली हे भौगोलिकदृष्ट्या वेगळे आहे.त्यामुळे शिरोलीची स्वतंत्र नगरपालिकेची मागणी जोर धरत आहे. शेजारी असलेल्या एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग, ट्रान्स्पोर्ट व्यवसाय, मार्बल मार्केट, गोदामे यामुळे अनेकांना शिरोलीत रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे गावाची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. तसेच अनेक परराज्यांतून आलेले लोक शिरोली गावातच स्थायिक झाले आहेत. त्यामुळे शिरोली ग्रामपंचायतीला नवीन उपनगरात सेवा-सुविधा देताना मर्यादा येत आहेत. त्यामुळे शिरोली गावाला नगरपालिका मंजूर करण्यासाठी नगरविकास विभागाकडे सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव दिला आहे. मात्र, यावर कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे प्रस्तावाला मंजुरी द्यावी, अशी मागणी खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुजित मिणचेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, तालुका प्रमुख बाजीराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, उपसरपंच सुरेश यादव यांनी शिंदे यांच्याकडे केली आहे.
फोटो १० शिरोली निवेदन
ओळी :
शिरोलीची प्रलंबित नगरपालिका मंजूर करावी, अशी मागणी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे शिवसेनेच्यावतीने करताना खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुजित मिणचेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, बाजीराव पाटील, महेश चव्हाण, सुरेश यादव आदी.