इचलकरंजी : येथील नगरपालिका विविध विषय समित्यांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कॉँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक आमदार प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत शनिवारी पार पडली. शहरातील विविध विकासकामांसाठी नगरपालिका सत्तेत राहून काम करून घेता येईल, असे मत सदस्यांनी व्यक्त केले.
नगरपालिकेच्या विषय समितीच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. विविध गटांच्या बैठका, चर्चा जोर धरल्या आहेत. सभापतिपदासाठी इच्छुक असलेले उमेदवार आपापल्या पद्धतीने फिल्डिंग लावण्यात व्यस्त आहेत. सध्या नगरपालिकेत कॉँग्रेस १८, भाजपा १४, ताराराणी विकास आघाडी ११, राजर्षी शाहू आघाडी १०, राष्ट्रवादी ७, शिवसेना १ व अपक्ष १ असे संख्याबळ आहे. पहिल्या टप्प्यात भाजपा, राष्ट्रवादी व ताराराणी विकास आघाडी यांची सत्ता होती. गतवर्षी विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यामध्ये फेरबदल होऊन ताराराणी व राष्ट्रवादीला बाजूला करून कॉँग्रेस व राजर्षी शाहू विकास आघाडी यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्यात आली. आता पुन्हा राजकीय घडामोडींमध्ये बदल झाला आहे. त्याचा नगरपालिका सत्तेत काही बदल जाणवणार का, यादृष्टीने घडामोडी सुरू आहेत. त्यामध्ये भाजपा किंवा राजर्षी शाहू विकास आघाडी यांना सत्तेतून बाजूला ठेवूनही गणिते आखली जात आहेत.
दरम्यान, एका जाहीर कार्यक्रमात आमदार आवाडे यांनी नगरपालिकेच्या कारभारावर नागरिक नाराज असल्याच्या कारणावरून आपण सत्तेतून बाजूला गेलेले बरे, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांनी कॉँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक घेतली. त्यामध्ये बारा नगरसेवक उपस्थित होते. ठरल्याप्रमाणे या शेवटच्या वर्षी जास्त उठाठेव न करता सत्तेत राहण्याबाबत सर्वांनी मत व्यक्त केले.