बहुतांश कार्यालयांनी पार्किंग जागेत उभारला पत्र्याचा डोम (शेड)
कार्यालयाच्या बुकिंगदिवशी त्या मार्गावरील वाहतुकीचा बट्ट्याबोळ
अतुल आंबी
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरातील मंगल कार्यालये, विविध संस्थांचे व समाजाचे हॉल यांनी हॉललगत असलेली पार्किंगची जागा पत्र्याचा डोम (शेड) उभा करून वापरात घेतली आहे. परिणामी कार्यक्रमादिवशी संपूर्ण पार्किंग रस्त्यावर होते. त्यामुळे त्या मार्गावरील वाहतुकीचा प्रत्येकवेळी बट्ट्याबोळ होतो. या अतिक्रमणाला जवळपास अधिकृतपणाचे स्वरूप प्राप्त होत आले आहे. याकडे नगरपालिकेने कधीही गांभीर्याने पाहिले नाही.
शहरातील विविध जाती-धर्मांच्या समाजाचे मल्टिपर्पज हॉल बांधण्यात आले आहेत. त्यासाठी अनेकवेळा लोकप्रतिनिधींचा निधी देणगी स्वरूपात वापरला आहे. त्याचबरोबर मंगल कार्यालये म्हणून व्यवसाय करणाऱ्यांनीही पार्किंगची जागा वापरात घेतल्याने या स्वरूपाच्या अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात वैयक्तिकपेक्षा समाजाचे हॉल जास्त असल्याने एखाद्या समाजाच्या विरोधात बोलणार कोण, असा प्रश्न निर्माण झाल्याने त्याकडे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. परिणामी हळूहळू ९० टक्के हॉलचे पार्किंग गायब झाले.
एखाद्या हॉलमध्ये लग्नसमारंभ असेल, तर त्यावेळी हॉलबाहेर रस्त्यावर मांडव व स्वागत कमान उभारली जाते. तसेच वरात, घोडे, बेंजो, फटाके हे सर्व कार्यक्रमही रस्त्यावरच पार पाडले जातात. लग्न करणारी व्यक्ती पहिल्यांदाच कार्यक्रम करीत असल्याने तो आपली संपूर्ण हौस भागविण्यासाठी प्रयत्न करीत असतो. त्याच्याजागी तो बरोबर मानला तरी, असे वारंवार कार्यक्रम असल्याने त्या मार्गावरून जाणाऱ्यांना अडथळा नित्याचाच बनतो. तसेच परिसरात राहणाऱ्या नागरिकांनाही त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.
वाढलेले शहर व वाढलेली लोकसंख्या त्यामुळे प्रत्येकाला जागेची कमतरता असल्याने, दारात लग्न हा प्रकार बंद होत चालला असून, हॉलमध्ये लग्न करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. परंतु सुरूवातीपासूनच नियमांचे काटेकोरपणे पालन झाले असते, तर लग्नकार्य करणाऱ्या व्यक्तीला हॉल व बाहेरची जागा व्यवस्थितपणे वापरता आली असती. ज्यांना तेवढी जागा पुरत नाही, ते शहराबाहेर असलेल्या मोठमोठ्या कार्यालयांमध्ये कार्यक्रम ठेवत असतात. या सर्व गंभीर बनलेल्या प्रश्नांकडे डोळसपणे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
(फोटो ओळी)
२२१२२०२०-आयसीएच-०३
२२१२२०२०-आयसीएच-०४
२२१२२०२०-आयसीएच-०५
इचलकरंजीत विविध मंगल कार्यालयांचे पार्किंग नसल्याने रस्त्यावर मंडप व त्यापुढे वाहने पार्क केली जातात.
(सर्व छाया- उत्तम पाटील)