कोरोना संसर्गामुळे गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक आणि वाद्याला परवानगी नाही. त्यामुळे विसर्जन मिरवणूक होणार नसल्याने मिरवणूक वाद्य व इतर खर्चाला पैसा बहुतेक मंडळांनी विसर्जनापूर्वी महाप्रसादासाठी खर्च केला जात आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव मंडळ अन्नदानाचे मंडळ बनले आहेत.
शहरासह ग्रामीण भागात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यानिमित्ताने दहा दिवस प्रबोधनात्मक, आध्यात्मिक कार्यक्रम, हालते, जिवंत देखावे सादरीकरण केले जाते. आगमनाबरोबरच विसर्जन मिरवणुकही तितक्याच धुमधडाक्यात केली जाते. मिरवणुकीतील आकर्षणासाठी मंडळामध्ये इर्ष्या लागते. कर्णकर्कश आवाजातील डॉल्बी, विद्युत रोषणाई, वाहनांची सजावट आदीवर कित्येक हजारांपासून लाखांपर्यंत पैशांची उधळपट्टी केली जाते. मात्र, कोरोना संसर्गामुळे दोन वर्षांपासून तरुणाइच्या या जल्लोषाला ब्रेक लागला आहे. जमावबंदी आदेश, कोरोनामुळे सर्वसामान्यांसह उद्योगधंदे, व्यावसायिक, नोकरवर्गाची आर्थिककोंडी झाल्याने याचा परिणाम गणेशोत्सवावर झाला आहे.
सध्या कोरोना संसर्गातून बाहेर पडत जनजीवन पूर्वपदावर येत असलेतरी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने शासनाने सार्वजनिक कार्यक्रम, उत्सवाबाबत कडक नियमावली तयार केली आहेत. पूर्वीप्रमाणे गणेशमंडळांनी मोठ्या प्रमाणात यावर्षी गणेशमूर्ती प्रतिष्ठापना केली आहेत. मिरवणुकीला बंदी असल्याने बहुतेक मंडळांच्याकडे देणगी, वर्गणीच्या माध्यमातून गोळा झालेला पैसा महाप्रसादाच्या रूपातून खर्च केला जात आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव अन्नदान करणारा उत्सव ठरत आहे.
---------------
जिवंत देखाव्याला ब्रेक
गणेशोत्सव काळात अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी जिवंत देखावा करत आपल्यातील अभिनय कौशल्याला वाव मिळत असे. मात्र कोरोनामुळे या कलेला ब्रेक मिळाला आहे.