कोल्हापूर : ‘उदं गं आई उदं’चा गजर, फुलांचा वर्षाव, भंडाऱ्याची उधळण... सुती, घुमकं, चौंडकं, हलगीचा कडकडाट... हिरव्या बांगड्या, ओटी व फुलांनी सजलेले श्री रेणुकादेवीचे मानाचे ‘जग’ सासनकाठी... फटाक्यांची आतषबाजी... अशा धार्मिक वातावरणात आज, शनिवारी सौंदत्तीला रवाना झाले. सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवीची यात्रा ५ डिसेंबर रोजी आहे. या यात्रेसाठी कोल्हापुरातून ओढ्यावरील रेणुका मंदिराचा मदनआई शांताबाई जाधव, रविवार पेठेतील बायाक्काबाई चव्हाण, शुक्रवार पेठेतील लक्ष्मीबाई जाधव व बेलबाग येथील शिवाजी आळवेकर यांचे मानाचे चार ‘जग’ जातात. आज दुपारी बारा वाजता बेलबाग येथील शिवाजी आळवेकर यांचा जग सौंदत्तीला रवाना झाला. दुपारी चार वाजता रेणुका मंदिर, रविवार पेठ आणि शुक्रवार पेठेतील मानाचे जग बिंदू चौकात आले. येथील गजेंद्रलक्ष्मी मंदिर येथे फुलांनी सजलेल्या जगांची हलगीसह वाद्यांच्या गजरात देवीची आरती झाली. फुलांच्या वर्षावात मानकऱ्यांनी हे जग डोक्यावर घेतले आणि ‘उदं गं आई उदं’चा गजर झाला. जगाच्या मार्गात फुलांचा वर्षाव आणि फटाक्यांची आतषबाजी केली जात होती. नागरिक जगांचे दर्शन घेत होते. या जगांची मिरवणूक बिंदू चौकातून आझाद चौक, उमा टॉकीज, ओढ्यावरील गणेशमंदिरमार्गे पार्वती टॉकीज येथे आली. येथे जगांना निरोप देण्यात आला. या यात्रेच्या दोन दिवस आधीच कोल्हापुरातील भाविक सौंदत्तीला रवाना होतात. तीन दिवस आणि चार रात्री असा या यात्रेचा कालावधी असतो. यात्रेच्या आदल्या दिवशी गोड नैवेद्य केला जातो. मुख्य यात्रेदिवशी कडबू, आंबील, वडी, वांगी, मेथी, भात असा नैवेद्य देवीला दाखविला जातो. यात्रा पार पडल्यानंतर चार ते पाच दिवसांनी कोल्हापुरातील ओढ्यावरील रेणुका देवीची आंबील यात्रा असते.
मानाचे ‘जग’ सौंदत्तीला रवाना
By admin | Updated: November 30, 2014 01:01 IST