कोल्हापूर : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या नेत्यांच्या ग्रामपंचायतीत बहुतांशी जणांनी आपले गड कायम राखले. सडोली खालसामध्ये पी. एन. पाटील, कोडोलीत विनय कोरे, मिणचेमध्ये आमदार सुजित मिणचेकर तर बसर्गेची सत्ता भरमूअण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा विजयाचा झेंडा लागला. प्रतिष्ठेच्या कानडेवाडीमध्ये आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या पॅनेलचा धुव्वा उडवत संग्राम कुपेकर यांनी सत्ता अबाधित राखली. राजकारणात तालुका व जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी मिळाली तरी प्रत्येकाचा राजकारणाचा पायाच ग्रामपंचायत असल्याने सत्तेसाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागते. या निवडणुकीतही दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. करवीर तालुक्यात सर्वांत लक्षवेधी ठरलेल्या सडोली खालसा ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व माजी आमदार संपतराव पवार यांच्यात प्रतिष्ठेची लढाई झाली. येथे पी. एन. यांच्या आघाडीने तेरापैकी आठ जागा जिंकत सत्तांतर घडविले. हळदीमध्ये ‘भोगावती’चे संचालक हंबीरराव पाटील यांना जोरदार झटका देत काँग्रेसने सत्ता स्थापन केली. आरे ग्रामपंचायतीत पी.एन. व स्वर्गीय भैय्या मोहिते गटाने राष्ट्रवादी,शेकाप व शिवसेनेच्या गटाचा सुपडासाफ करत सत्तांतर घडवून आणले. तळाशी ग्रामपंचायतीमध्ये मारुतराव जाधव यांना सत्ता राखताना दमछाक झाली. कोडोली ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वाधिक लक्ष होत. तिथे माजी मंत्री विनय कोरे यांना माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील, अमर पाटील,डॉ.जयंत पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील यांनी आघाडी करून आव्हान दिले. परंतू तिथे सतरा पैकी दहा जागा जिंकून कोरे यांनी आपणच अजूनही गावाचे खरे नेते असल्याचे दाखवून दिले. पोर्लेमध्ये जिल्हा परिषदेच्या सदस्य प्रकाश पाटील व बाजार समितीचे संचालक परशराम खुडे यांच्यात झालेल्या अस्तित्वाच्या लढाईत पाटील यांनी सत्ता कायम राखली.वेतवडे ग्रामपंचायतीची सत्ता कायम राखण्यात जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे यांना यश आले. मिणचे ग्रामपंचायतीसाठी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यांनी निकराची झुंज देत १३ पैकी ९ जागा जिंकत सत्तांतर घडविले. गडहिंग्लजमधील आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कानडेवाडी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या चन्नेकुप्पी, माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या नूल ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशीने झाली. चन्नेकुप्पीमध्ये प्रकाश चव्हाण यांच्या आघाडीचा पराभव करत पुतण्या अमर व उदय चव्हाण यांनी सत्ता हस्तगत केली. विधानसभेच्या उमेदवारीवरून कुपेकर घराण्यात उभी फूट पडल्याने कानडेवाडीच्या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. येथे आमदार कुपेकर व जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती संग्राम कुपेकर यांच्यात थेट सामना झाला. येथे संग्राम कुपेकर यांनी सत्ता कायम राखली. नूलमध्ये श्रीपतराव शिंदे यांनी सोयीची आघाडी करत सत्ता अबाधित राखण्यात यश मिळविले. बसर्गे ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यात माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांनी आपली सत्ता कायम राखली. आजऱ्यामध्ये महिला काँग्रेसच्या अध्यक्ष व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अंजनाताई रेडेकर यांची पेद्रेवाडीतील सत्ता संपुष्टात आली. एकंदरीत माजी मंत्री विनय कोरे, श्रीपतराव शिंदे, पी. जी. शिंदे व मारुतीराव जाधव यांना सत्ता कायम राखण्यात यश आले तर आमदार संध्यादेवी कुपेकर, संपतराव पवार यांच्या आघाडीला पराभवाचा झटका बसला. आमदार डॉ. सुजित मिणचेकर, पी. एन. पाटील यांनी सत्तांतर घडवत वर्चस्व प्रस्थापित केले.चंदगडमध्ये तालुकाप्रमुखांचे पानिपतचंदगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष एम. जे. पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नामदेव दळवी व शिवसेनेचे तालुका प्रमुख महादेव गावडे यांच्या पॅनेलचा पुरता धुव्वा उडाला. तिन्ही तालुकाध्यक्षांचे पानिपत झाल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
नेत्यांनी गावांचे गड राखले
By admin | Updated: July 28, 2015 01:23 IST