कोल्हापूर : महापालिका प्रशासनाकडे गंगावेश ते शिवाजी पूल रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. मंगळवारी आखरी रास्ता कृती समितीच्यावतीने अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्याकडे पुन्हा रस्ता करण्याची मागणी केली. मात्र, हे निवेदन अखेरच असेल, आठ दिवसांत रस्ता झाला नाही, तर आक्रमक आंदोलनाची मालिकाच सुरू केली जाईल. यावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास प्रशासन जबाबदारी राहील, असा इशारा देण्यात आला.
गंगावेश ते शिवाजी पूल रस्ता कोकणासह जोतिबा, पन्हाळाकडे जाणारा मुख्य मार्ग आहे. तसेच पंचगंगा स्मशानभूमीकडे जाणारा हाच रस्ता ‘आखरी रस्ता’ म्हणून ओळखला जातो. या रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल आखरी रस्ता कृती समितीच्यावतीने वेळोवेळी आंदोलनात्मक लढा उभारला. महापालिका प्रशासनाने रेंगाळलेले ड्रेनेज काम त्वरित करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु अद्यापही या कामाला मुहूर्त मिळाला नाही. धुळीचा व वाहतुकीचा प्रचंड त्रास होत असून येथील नागरिकांच्या संतप्त भावना असल्याचे कृती समितीने सांगितले. यावेळी किशोर घाटगे, राकेश पाटील, रियाज बागवान, सनी अतिग्रे, सुरेश कदम, महेश कामत, राजवर्धन यादव, जयश्री चव्हाण पाटील, आदी उपस्थित होते.
चौकट
झारीतील शुक्राचार्य कोण
शहरात गल्लीबोळातील रस्ते युद्धपातळीवर सुरू आहेत. याच रस्त्याबद्दल दुजाभाव का केला जात आहे. रस्ता लवकर होऊ नये म्हणून प्रयत्नशील असणारे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत, असा सवाल कृती समितीने उपस्थित केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी निविदा पूर्तता तत्काळ करून आठ दिवसांत काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.
फोटो : ०२०२२०२१ कोल केएमसी आखरी रास्ता निवेदन
ओळी : कोल्हापुरातील गंगावेश ते शिवाजी पूल रस्त्याचे काम तातडीने करण्याची मागणी मंगळवारी आखरी रास्ता कृती समितीच्यावतीने करण्यात आली.