कोल्हापूर : नोएडा (उत्तर प्रदेश) येथे २३ व २४ जानेवारीस होणाऱ्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी राज्य संघ निवड चाचणी रविवारी झाली. कोल्हापूरच्या शुभम सिद्धनाळे, अक्षय हिरुगडे, पृथ्वीराज पाटील, विजय पाटील यांची या संघात विविध किलो गटात वर्णी लागली. या संघाचे नेतृत्व जागतिक पदक विजेता व राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता नरसिंग यादव करणार आहे.
भारतीय कुस्ती महासंघाच्यावतीने नोएडा येथे होणाऱ्या ६५ व्या वरिष्ठ पुरुष फ्री स्टाईल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचणी पुण्यातील मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रात रविवारी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून घेण्यात आली. या निवड चाचणीत राज्यातील विविध तालमींमधून शेकडो मल्लांनी सहभाग घेतला. त्यात कोल्हापूरच्या शुभम सिद्धनाळे याने ९७ ते १२५ किलो गटात बाजी मारत राज्य संघात स्थान मिळवले, तर बानगे (ता. कागल) च्या अक्षय हिरुगडे यानेही ६५ किलो गटात, तर पृथ्वीराज पाटील (देवठाणे ) याने ९२ किलो गटात व पासुर्डेच्या विजय पाटील याने ५७ किलो गटात प्रतिस्पर्धी मल्लांना अस्मान दाखवित संघातील स्थान पक्के केले. या निवडी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या.
निवड झालेला संघ असा : विजय पाटील (५७ किलो गट), सुरज कोकाटे ( ६१ किलो), अक्षय हिरुगडे (६५ किलो), कालिचरण सोलनकर ( ७० किलो), नरसिंग यादव (७४ किलो), समीर शेख ( ७९ किलो), वेताळ शेळके (८६ किलो), पृथ्वीराज पाटील (९२ किलो), सिकंदर शेख (९७ किलो), शुभम सिद्धनाळे (९७ ते १२५ किलो).
फोटो : १००१२०२१-कोल-कुस्ती
ओळी : नोएडा येथे होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पुण्यातील मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रात रविवारी निवड चाचणी झाली. यात निवडण्यात आलेल्या राज्य संघासोबत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे व अन्य मान्यवर उपस्थित होते.