कोल्हापूर : आयआरबीने शहरातील सर्व नऊ टोलनाक्यांची डागडुजी करण्यास आज, शुक्रवारपासून सुरुवात केली. कर्मचारी तैनात करण्याबरोबरच नाक्यांवर संगणक यंत्रणा सज्ज करण्याची तयारी केली आहे. सोमवारी (दि. ९) टोलविरोधी महामोर्चा व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोलमुक्तीबाबत अधिवेशन संपण्यापूर्वी निर्णय होण्याचे दिलेले संकेत या पार्श्वभूमीवर पुन्हा टोल सुरू करण्याची घाई सुरू झाली आहे. आयआरबीच्या टोल- घाईला अनेक पैलू असून राज्य शासनावर दबाव टाकण्यासाठी येत्या एक-दोन दिवसांत टोलवसुली सुरू होण्याचे संकेत आहेत.टोलवसुलीची अंतिम तयारी पूर्ण केली असली तरी आयआरबीचे कार्यकारी संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्या सूचनेनंतरच प्रत्यक्ष टोलवसुली सुरू केली जाणार आहे. कोल्हापुरातील सर्व परिस्थितीवर आयआरबीचे अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पोलीस प्रशासनाने यापूर्वीच पोलीस बंदोबस्त तयार असून पोलिसांसाठी विश्रांतीची शेड, शौचालय, आदी पायाभूत सुविधा पुरविण्याची मागणी केली होती. ही मागणीही आयआरबीने पूर्ण केली आहे. कोणत्याही क्षणी टोल सुरू होण्याची शक्यता असल्याने शहरवासीयांसह आंदोलकांत कमालीची अस्वस्थता पसरली आहे. टोल सुरू झाल्यास जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांसह आंदोलक काय भूमिका घेतात, याबाबत उत्सुकता आहे.टोलवसुलीची स्थगिती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने उठताच टोल सुरू करण्याच्या हालचालींबरोबरच टोलविरोधी आंदोलनानेही उचल खाल्ली. सोमवारी, ९जूनला जिल्हाधिकारीकार्यालयावर तिसऱ्यांदा महामोर्चा काढण्यात येणार आहे. काल, गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोलबाबत अधिवेशन संपण्यापूर्वी सकारात्मक निर्णय होण्याचे संकेत दिले आहेत. तत्पूर्वीच टोलवसुली सुरू करून धक्कातंत्राचा वापर करण्याची व्यूहरचना कंपनीने आखली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी टोलबाबत निर्णय अपेक्षित आहे. यामुळे टोेलवसुली सुरू करून दबावतंत्राचा वापर करत सरकारला आपल्या पारड्यात झुकते माप देण्यास भाग पाडण्याची तयारी आयआरबीने केली आहे. (प्रतिनिधी)
कोल्हापुरात पुन्हा टोलघाई सुरू
By admin | Updated: June 7, 2014 01:04 IST