कोल्हापूर : शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू असलेले कोल्हापूर रेल्वेस्थानक प्लॅटफॉर्मपासून पादचारी पुलासारख्या मूलभूत सुविधांसाठी आजही झगडत असल्याचे चित्र असले, तरी देशभरातील रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्याच्या योजनेस केंद्राने मंजुरी दिली आहे. या योजनेतील ‘अ’ वर्गात कोल्हापूर स्थानकाचाही समावेश झाल्यामुळे कोल्हापूर रेल्वेस्थानक आता खऱ्या अर्थाने विकासाच्या ‘ट्रॅक’वर येण्याची आशा आहे.पश्चिम महाराष्ट्रातील आर्थिक घडामोडींचे प्रमुख केंद्र असलेल्या कोल्हापूर शहरातील या रेल्वेस्थानकाला १२४ वर्षे पूर्ण झाली आहेत. सन २००३ साली या रेल्वेस्थानकाचे नामकरण ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज टर्मिनस’ करण्यात आले. यानंतरच्या काळात या रेल्वेस्थानकाच्या विकासासंदर्भात अनेक नेत्यांनी घोषणा केल्या; पण त्यांची पूर्तता झाली नाही. प्लॅटफॉर्मची संख्या वाढली नाही, ना पादचारी पूल बांधण्यात आले. कोल्हापुरातील राजकीय नेत्यांनीही या रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी एकत्रितपणे प्रयत्न केले नाहीत. केंद्राच्या रेल्वेस्थानक पुनर्विकास योजनेत कोल्हापूरच्या रेल्वेस्थानकाचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर रेल्वेस्थानकामधील विविध समस्यांवर टाकलेला हा प्रकाशझोत. (प्रतिनिधी) अतिक्रमित जागा ताब्यात घेणे गरजेचे परीख पूल ते जुने रेल्वे फाटक या दरम्यान रेल्वेची सुमारे साडेबारा एकर जमीन आहे. यातील बहुतांश जागेत अतिक्रमणे करण्यात आली आहेत. ही जागा ताब्यात घेऊन या ठिकाणी जनरल डब्याने प्रवास करणाऱ्यांसाठी तिकीट खिडकी, सार्वजनिक प्रतीक्षागृह, सुलभ शौचालयांची उभारणी करता येणे शक्य आहे. यासाठी रेल्वेने ही अतिक्रमण केलेली जागा ताब्यात घेणे आवश्यक आहे. प्रतीक्षागृहांची संख्या पुरेशी नसल्यामुळे प्रवासी प्लॅटफॉर्मवर कुठेही बसतात. अनेकजण खाद्यपदार्थ खाऊन झाल्यानंतर उरलेसुरले तिथेच टाकून देतात. त्यामुळे रेल्वेस्थानकामध्ये अस्वच्छता हा कळीचा प्रश्न बनला आहे. जादा गाडीसाठी प्लॅटफॉर्मची संख्या वाढविणे आवश्यक आहे, अशी माहिती महाराष्ट्र रेल्वे व रोड पॅसेंजर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवनाथ बियाणी यांनी दिली.प्लॅटफॉर्म कोल्हापूर रेल्वेस्थानकाला १२४ वर्षे पूर्ण झाली आहेत. मध्य रेल्वेचे हे शेवटचे स्थानक आहे; पण कोल्हापूर-पुणे रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, कोल्हापूर रेल्वे कोकणला जोडावी या मागण्या खूप जुन्या आहेत.रेल्वेस्थानकामध्ये तीन प्लॅटफॉर्म आहेत. यांपैकी एक आणि तीन क्रमांकांचे प्लॅटफॉर्म अपुरे आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ यांची उंची खूपच कमी असल्यामुळे अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. सध्या या प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे; पण हे काम पूर्ण होण्यासाठी अद्यापही नऊ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. आवश्यक कामे :प्लॅटफॉर्मच्या संख्येत वाढ, सध्या केवळ तीनच प्लॅटफॉर्म आहेत. जनरल प्रतीक्षागृहे सुरू करणे शौचालयांची संख्या वाढविणे रेल्वेस्थानक परिसरातील अतिक्रमणे काढणे परीख पूल आणि विक्रमनगर येथे पादचारी पूल उभारणे. पादचारी पुलाचा अभाव अन् जिवाला धोका परीख पूल येथे पादचारी पूल व्हावा, ही मागणी अनेक वर्षे प्रलंबित आहे. याशिवाय विक्रमनगर येथेही पादचारी पुलाची आवश्यकता आहे. या ठिकाणी पादचारी पूल नसल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका आहे. रेल्वेस्थानकाच्या आधुनिकीकरणात या ठिकाणी पादचारी पूल होणे अत्यावश्यक आहे. आसनव्यवस्थेचा अभाव रेल्वेस्थानकाच्या तिकीटगृहामध्ये साधारण प्रवाशांसाठी आसनव्यवस्था नाही; त्यामुळे प्रवाशांना तिकिटासाठी ताटकळत उभे राहण्याशिवाय पर्याय नाही. गाडीला काही कारणाने विलंब झाला किंवा तिकिटांसाठी गर्दी असेल, तर प्रवाशांना बसण्याची अडचण निर्माण होते.
कोल्हापूर रेल्वे ‘ट्रॅक’वर
By admin | Updated: July 18, 2015 00:20 IST