लोकमत न्यूज नेटवर्क
कोगनोळी : कर्नाटकातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला असून, दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. कोगनोळी ग्रामपंचायतीसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये रविवारी (दि. २७) मतदान होत आहे. उमेदवारांनी वॉर्डनिहाय बैठकांबरोबरच मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला आहे. कोगनोळी ग्रामपंचायतीसाठी काँग्रेसप्रणीत माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील ग्रामविकास आघाडी व भाजपप्रणीत परिवर्तन आघाडी यांच्यामध्ये लढत होत आहे. आजपर्यंत ग्रामपंचायतीवर ग्रामविकास आघाडीची एकहाती सत्ता आहे. भाजपप्रणीत परिवर्तन आघाडी महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांनी गावाच्या विकासासाठी दिलेल्या निधीच्या जोरावर मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. परिवर्तन आघाडीला एसटी प्रवर्गाचा उमेदवार न मिळाल्याने ग्रामविकास आघाडीच्या मंगल शिवाजी नाईक यांची निवड बिनविरोध झाली आहे.