सन १९७२ मध्ये रोजगार हमी योजनेतून गावाच्या दक्षिणेला पाझर तलाव बांधण्यात आला होता; पण या पाझर तलावाला मोठी गळती असल्याने त्याच्यात पाणी साठवण होत नव्हती. हा तलाव मृद व जलसंधारण विभागाकडे वर्ग केल्याने डागडुजीसाठी ५६ लाख ६७ हजार निधी मंजूर करण्यात आला होता. यानंतर तलावावरील झाडे काढून साफसफाई करण्यात आली व पायाखुदाई करून कामास सुरुवात करण्यात आली. तथापि, जून महिन्यात तलावाच्या अश्मपटलाचे काम प्रगतिपथावर असतानाच चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे अश्मपटलाचे दगड व मुरुम तलावात घसरुन गेला होता. यामुळे तलावास धोका निर्माण झाला होता. तलावाच्या खाली असणाऱ्या काटेभोगाव गावातील शेतीसह परिसरातील शेकडो एकर शेती धोक्यात आली होती.
याबाबत आमदार पी.एन. पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. यावर मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी या प्रश्नाबाबत खुलासा करताना ही वस्तुस्थिती खरी असून, ३ जून २०२० रोजी तलावाच्या अश्मपटलाचे काम प्रगतिपथावर असतानाच चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे
अश्मपटलाचे दगड व मुरुम तलावात घसरुन गेला. पावसाळ्यात पाणीसाठा असल्याने काम थांबलेले होते. शासनाच्या निधीचा कोणताही अपव्यय झालेला नव्हता. निविदेमधील काम पूर्ण झाले नसल्याने लवकरच कामास नव्याने सुरुवात करून चांगले दर्जेदार काम करून घेणार असल्याची माहिती सभागृहाला दिली होती.
फोटो अोळ -
काटेभोगाव (ता. पन्हाळा) पाझर तलाव दुरुस्तीच्या कामास नव्याने सुरुवात झाली आहे. तलाव परिसरात अश्मपटलाचे (दगडी पिचिंग ) व भरावाचे काम सुरू असताना.