शिवराज लोंढे -- सावरवाडी यंदाच्या खरीप हंगामातील जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी झाले असून करवीर तालुक्यात नद्यांच्या पात्रात पाण्याची पातळी खालावली गेली. सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजनाद्वारे पिकांना होणाऱ्या अपुरा पाणीपुरवठ्यामुळे हातातोंडाशी आलेली खरीप पिके वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पाण्याची पातळी खालावल्याने पावसाविना तालुक्याच्या पश्चिम भागातील दोनशे एकर उभे ऊस पीक वाळू लागल्याने शेतकऱ्यांची स्थिती केविलवाणी झाली आहे.डोंगरी भागातील खरीप पिके पावसाअभावी वाळू लागली आहेत. नाचना, ज्वारी, भूईमुग, वरी, सोयाबीन, भात, ऊस या पिकांना यंदा अपुऱ्या पावसाचा फटका बसू लागला आहे. दुष्काळसदृश स्थिती निर्माण होऊ लागल्याने खरिपाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.पावसाने दडी मारल्याने नदी व विहिरीतील पाणी शेतीला देण्यासाठी बळिराजाला कठोर परिश्रम करावे लागले. ऊस क्षेत्राला नियोजित हंगामात पाणी वेळेवर न मिळाल्यामुळे ऊस पिके सध्या वाळू लागली आहेत. नद्यांच्या पात्रात पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने शेती पिकांबरोबर नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाणी प्रश्न भेडसावणार आहे. यंदाच्या खरीप हंगामात ऊस पिकांना मुबलक प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे विविध खतांचे डोस शेतकऱ्यांनी देणे बंद केले. शिवाय वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्यामुळे ऊस पिकांच्या वाढीवर गंभीर परिणाम झाल्याने साखर कारखान्यांच्यासमोर चालू ऊस गळीत हंगामात ऊस खोडवा, बोडवा, ऊस लागण क्षेत्र ऊस पिकांतून एकरी २0 ते २५ हजार रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. याचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होणार आहे. खरीप हंगामात पाऊस झाला नसल्यामुळे उसाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून ऊस टंचाईचा फटका साखर कारखान्यासह ऊस तोडणी मजूर, ऊस वाहतूकदार, शेतकरी, नोकरदार वर्ग यांना बसणार आहे. यावर्षी दुष्काळ स्थिती निर्माण झाल्यामुळे भात, भुईमूग, वरी, नाचणा या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. तालुक्यातील डोंगरी भागात गेल्या अनेक वर्षांपासून पाझर तलावाच्या उभारणीकडे दुर्लक्ष झाले. मोठ- मोठे तलावांची उभारणी झाली नसल्यामुळे पाणी आडवा योजना राबविल्या नाहीत. परिणामी भोगावती, तुळशी नद्यांवरील पाण्याचा ताण अद्याप कमी झालेला नाही. दुष्काळ काळात शेतीला पाणीपुरवठ्याबाबत अद्याप कोणत्याच डोंगरी भागात योजना राबविल्या नसल्यामुळे पाणी टंचाई काळात शेती ओलिताखाली आणण्याचे स्वप्न भंगले आहे. पावसाची साथ न लाभल्यामुळे खरीप पिकांबरोबर ऊस पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. राज्य शासनाने करवीर तालुका दुष्काळ जाहीर करावा. शेतीला पाणी मिळाले पाहिजे. यासाठी पाझर तलावांची उभारणी होणे गरजेचे आहे. -रघुनाथ वरुटे, बहिरेश्वर , ता. करवीर
‘करवीर’चे २00 एकरांतील ऊस पीक धोक्यात
By admin | Updated: September 26, 2015 00:13 IST