लोकमत न्यूज नेटवर्क
अणुस्करा : कासारी खोऱ्यातून शाहूवाडी येथे तालुक्याच्या ठिकाणी व मोठी बाजारपेठ मलकापूर येथे जाण्यासाठी अत्यंत जवळचा मार्ग म्हणजे करंजफेण -शाहूवाडी हा रस्ता. परंतु मागील दहा वर्षांपासून कोणतीही दुरुस्ती न झाल्याने हा रस्ताच खड्ड्यात गेला आहे.
शाहूवाडीच्या दक्षिणेकडच्या डोंगरी भागात दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे. नाले बुजले आहेत, रस्ता वाहून जाऊन मध्यभागी मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर थोड्याच दिवसांत बॉक्साईटची वाहतूक सुरू झाल्यावर रस्त्यावर धुळीचे लोट पसरतात. त्यामुळे सामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. हा रस्ता पूर्णपणे घाटाचा असूनसुद्धा कोठेही सूचना फलक लावलेले नाहीत. बऱ्याच ठिकाणी संरक्षक कठडे, मोऱ्या कोसळल्याने अवजड वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. रस्त्याची खडी पूर्णपणे वर आल्याने या आडवळणी रस्त्यावर वाहने पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे.
चौकट(रिंगेवाडीजवळील खिंड धोकादायक
या रस्त्यावर रिंगेवाडीजवळ खिंड अतिशय धोकादायक बनली आहे, या ठिकाणी डोंगर फोडून रस्ता तयार केल्यामुळे या खिंडीत दोन्ही बाजूला मोठी दरडी कोसळण्याच्या अवस्थेत आहेत. जीर्ण झालेल्या झाडांमुळे धोका निर्माण झाला आहे.
या भागातील नागरिकांनी वारंवार मागणी करूनसुद्धा प्रशासनाने दखल घेतलेली नाही. दऱ्याखोऱ्यांनी व्यापलेल्या या प्रदेशात धोकादायक स्थितीत असलेल्या डोंगरी भागातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासकीय निधीची नितांत गरज आहे. तालुक्याला जोडणारा हा रस्ता असल्यामुळे तत्काळ रस्त्याचे डांबरीकरण करून मलकापूर- करंजफेण बस (एस. टी .) सेवा सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थी व प्रवासीवर्गातून होत आहे.
फोटो ओळी :- ०६ करंजफेण रोड
करंजफेण -शाहूवाडी रस्त्यावर ओकोली गावाजवळ वाहून गेलेला रस्ता.