कोल्हापूर : त्रिस्तरीय पंचायत राजव्यवस्थेचा पाया घालणारे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा रविवारी जिल्हा परिषदेच्या दारात पुतळा स्थानापन्न झाला. जिल्हा परिषदेच्या आवारात पुतळा बसवणारी कोल्हापूर ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे. हा पुतळा देशातील चौथ्या क्रमांकाचा पुतळा ठरला आहे.
राज्यातील एकाही जिल्हा परिषदेसमोर यशवंतराव चव्हाणांचा पुतळा नसल्याचे पाहून माजी कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांनी १९८६ मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने प्रतिष्ठान स्थापन केले. माजी नगराध्यक्ष एम. के. जाधव, माजी महापौर बळिराम पोवार, माजी नगराध्यक्ष के. बी. जगदाळे, मराठा बँकेचे वसंतराव मोहिते, जगन्नाथ पोवार, विजयसिंह पाटील, किसनराव कल्याणकर, संभाजीराव पाटील, जयकुमार शिंदे यांना प्रतिष्ठानच्या समितीत घेतले. त्यानंतर २०१८ मध्ये पुतळा बसविण्याबाबत चर्चा झाली खरी मात्र प्रतिष्ठानकडे साडेचार लाख रुपये होते. पुतळ्यासाठी उद्योगपती व्ही. बी. पाटील यांनी चबुतरासाठी साडेसात लाख रुपये दिले. पुतळा सप्टेंबर २०२० मध्ये पूर्ण झाला होता, त्याचे अनावरण १२ मार्च २०२० रोजी करण्याचे निश्चित झाले होते, मात्र लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडले. २२ जानेवारीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होत आहे.
चौकट ०१
पुतळा समितीचे योगदान
पुतळा समितीत अशोक पोवार, माणिक मंडलिक, रमेश मोरे यांचा सदस्य म्हणून समावेश केला गेला. त्यांनी पुतळ्याची सरकारकडून परवानगी मिळवण्याची किचकट प्रक्रिया तब्बल सहा महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर पूर्ण केली.
देशातील चौथ्या क्रमांकाचा पुतळा
दिल्लीत संसद भवन परिसर, कराडमध्ये कराड अर्बन बँक आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा आहे. कोल्हापुरातील हा पुतळा देशातील चौथ्या क्रमांकाचा आहे.
कोल्हापुरातच निर्मिती
पुतळा कोल्हापुरात तयार झाला आहे. बापट कॅम्प येथील कारागीर संजय तडसकर यांनी यशवंतराव चव्हाण ब्राँझमध्ये अगदी हुबेहूब साकारले आहेत. निर्मितीचे काम ६ महिने चालले होते. १२ लाख रुपये खर्च आला आहे. ९ फूट उंची आहे.
(फोटो: १००१२०२१-कोल-झेडपी)
फोटो ओळ : यशवंतराव चव्हाण यांचा पूर्णाकृती पुतळा रविवारी कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्थानापन्न झाला.