छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. शिवप्रसाद हिरुगडे गेली पंधरा वर्षे अविरतपणे लहान मुलांवरील अवघड शस्त्रक्रिया करण्याचे काम करत आहेत. त्यांनी आतापर्यंत सहा हजार मुलांवर शस्त्रक्रिया केल्या असून त्यापैकी तीन हजारांपेक्षा अधिक शस्त्रक्रिया या एकदम क्लिष्ट होत्या, त्यांच्या या कामांबाबत त्यांच्याशी साधलेला थेट संवाद....प्रश्न : बाल शल्य चिकित्सक या क्षेत्राकडे कसे वळलात?उत्तर : खरंतर सर्जन म्हणून शिक्षण पूर्ण केल्यानंतर विविध पर्याय माझ्यासमोर होते; पण सुरुवातीपासूनच लहान मुले व त्यांच्या दुर्दम्य आजारांमुळे सामान्य कुटुंबांची परवड होताना बघितली होती. याबाबत आपणाला काही करता येईल का, असे पहिल्यापासून वाटत होते म्हणूनच या ‘स्पेशालिटी’कडे वळलो. प्रश्न : एक वर्षाचा करार संपल्यानंतर तुम्ही खासगी प्रॅक्टिस करू शकला असता?उत्तर : बरोबर आहे, सन २००१ मध्ये मी प्रमिलाराजे रुग्णालयात काम करण्यास सुरुवात केली. एक वर्षानंतर मी खासगी प्रॅक्टिस सुरू करू शकलो असतो; पण मला त्यात समाधान नव्हते म्हणूनच गेली १५ वर्षे येथे समाधानाने काम सुरू आहे. प्रश्न : खासगी प्रॅक्टिस सोडून नोकरीत रस कसा?उत्तर : मी सुरुवातीलाच आपणाला सांगितले, सामान्य कुटुंबातील रुग्णांची कणव मी जवळून बघितलेली आहेत. त्यात मी सरकारी कॉलेजमधून एक पैसाही खर्च न करता शिक्षण घेतले, मग समाजाची सेवा करण्याची बांधीलकी माझी राहते. येथे मिळत असलेल्या पगारात मी व माझे कुटुंब सुखी असेल तर दुसरा विचार कशाला करायचा.प्रश्न : आपण अनेक क्लिष्ट शस्त्रक्रिया केल्या, त्यातील अनुभव कसे होते?उत्तर : आतापर्यंत सहा हजारांपेक्षा अधिक लहान मुलांच्या शस्त्रक्रिया करून त्यांचे जीवन सुस्ह्य करण्याचा प्रयत्न केला. त्यातील सुमारे तीन हजार शस्त्रक्रिया तर एकदम क्लिष्ट होत्या. हे काम माझ्यासाठी नेहमीच आव्हानात्मक राहिले; पण त्यातून नवीन शिकता आले. बीड जिल्ह्यातील एका ऊसतोड मजुराच्या १७ दिवसांच्या बाळाच्या जठराशेजारील लहान आतड्याची शस्त्रक्रिया माझ्या आयुष्यात संस्मरणीय राहिली आहे. लोक सीपीआरबध्दल कितीही तक्रारी करत असले तरी अवघड शस्त्रक्रिया याच रुग्णालयात केल्या आहेत. प्रश्न : लहान मुलांवर उपचार करणे तशी जोखीम असते, आतापर्यंत काही प्रसंगी उद्भवले?उत्तर : नाही, सीपीआरमध्ये येणारा प्रत्येक रुग्ण हा सामान्य कुटुंबातील असतो, आपले बाळ बरे व्हावे, अशी त्याची मनोमन इच्छा असते. मलाही मुले असल्याने लहान मुलांवर शस्त्रक्रिया करताना काही काळ माझे हातही थरथरतात; पण पुन्हा माझ्यातील डॉक्टर जागा होतो आणि कितीही अवघड शस्त्रक्रिया असली तरी ती यशस्वी होते. माझ्याकडे येणाऱ्या रुग्णाच्या आई-वडिलांचा आमच्या यंत्रणेवर विश्वास असल्याने आजपर्यंत कोणताही वाईट अनुभव आलेला नाही. प्रश्न : डॉक्टर म्हटले की सामान्य माणसाच्या अंगावर काटा मारतो, हे चित्र बदलण्यासाठी काय सांगाल?उत्तर : सर्वच ठिकाणी असे चित्र आहे, असे म्हणता येणार नाही. अनेक डॉक्टर चांगली सेवा देतात, आपण एक सर्जन आहोत, रुग्णालयात येणारा रुग्ण हा टाईमपाससाठी येत नाही. त्याला होणाऱ्या त्रासातून मुक्त होण्यासाठी येतात; पण दुर्दैवाने काही मंडळींना त्याचा विसर पडलेला आहे. येणाऱ्या रुग्णांची विचारपूस करून आपल्याकडे उपलब्ध आहे ती सेवा चांगल्या पद्धतीने दिल्यास तक्रार येणार नाही. प्रश्न : वैद्यकीय क्षेत्रातील मानसिकता बदलेल असे वाटते का?उत्तर : निश्चित बदलेल, समाजाकडून आपण पैसा गोळा करायचा आणि समाजसेवा म्हणून त्यातील काही पैसा खर्च करायचा, हा फंडा अलीकडे रूढ झाला आहे. पैशांपेक्षा आपण एक सर्जन आहोत याचे भान ठेवले, तर बिनपैशांची समाजसेवा आपोआपच होते. प्रश्न : रुग्णांच्या नातेवाइकांना कसा विश्वास देता?उत्तर : माझ्याकडे कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व कर्नाटकातून रुग्ण येतात. माझ्यावर व येथील यंत्रणेवर त्यांचा विश्वास असल्यानेच एवढ्या लांबून लोक येतात, माझा सल्ला ऐकतात. विश्वास कामातून निर्माण होतो आणि मी गेले पंधरा वर्षे तेच केले. प्रश्न : लहान मुलांच्या शस्त्रक्रियेत तुम्ही मास्टर आहातच पण यापेक्षा वेगळे करण्याचा मानस आहे?उत्तर : मी कधीही शिक्षण थांबविलेले नाही, ‘एलएल.बी.’, एम. ए. (अर्थशास्त्र) अशा अनेक पदव्या आतापर्यंत घेतल्या आहेत. त्याचबरोबर माझ्या व्यवसायामध्येही नवीन काही तरी करण्याचा प्रयत्न असतो, आगामी काळात दुर्बिणीतून शस्त्रक्रिया हेच माझे टार्गेट आहे. मणक्यावरील गाठीच्या आॅपरेशनने कायमचे अपंगत्व येते, या शस्त्रक्रियेसाठी सीपीआरमध्येच क्लिनिक सुरू करण्याचा मानस आहे. प्रश्न : आतापर्यंतच्या तुमच्या यशात कोणाचे सहकार्य मिळाले?उत्तर : विभागातील सहकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्यच नाही. विभागप्रमुख डॉ. वसंतराव देशमुख यांच्यासह भूलतज्ज्ञ विभागाच्या सहकाऱ्यांचा उल्लेख करावा लागेल. या रुग्णालयाचा व आपल्या सेवेचा लोकांना चांगला फायदा होतो हे विचारात घेतले की येथे काम करण्यास नवा हुरूप येतो. - राजाराम लोंढे
मानसिकता बदलल्यास बिनपैशाची समाजसेवा !
By admin | Updated: March 16, 2016 23:55 IST