केंद्र सरकारच्या उद्योग आणि विदेश व्यापार मंत्रालयाने इचलकरंजी शहराची ‘टाऊन आॅफ एक्स्पोर्ट एक्सलन्स’ म्हणून घोषणा केल्याने निर्यातदार शहराच्या जागतिक नकाशावर वस्त्रनगरीची ठळक ओळख अधोरेखित झाली आहे. यामुळे निर्यातभिमुख शहरांच्या यादीत इचलकरंजी शहराचा समावेश होऊन इचलकरंजीतील कापड उत्पादकांच्या बँ्रडचा ठसा निर्यातीच्या बाजारात उमटला आहे.केंद्र सरकारने निर्यात करणाऱ्या शहरांचा अभ्यास केला असता इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगातून वर्षात ७५० कोटी रुपयांहून अधिक सूत व कापड उत्पादन निर्यात होत असल्याचे आढळून आले. तीन वर्षाच्या सर्वेक्षणानंतर निर्यातीत सातत्य असल्याचे निदर्शनात आले. विदेश व्यापार व उद्योग मंत्रालयाने १८ डिसेंबरला येथे निर्यात बंधू योजनेंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा राबविली असता त्यामध्ये अतिरिक्त महासंचालिका कविता गुप्ता यांनी टाऊन आॅफ एक्स्पोर्ट एक्सलन्सची घोषणा केली.इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगास शतकोत्तर वस्त्रोद्योगाची परंपरा आहे. या कालावधीत शहराने वस्त्रोद्योगाच्या बाजारातील अनेक चढ-उतार पाहिले आहेत. आता या शहर व परिसरात सव्वा लाख साधे यंत्रमाग व २५ हजार अत्याधुनिक (शटललेस) माग आहेत. साधारणत: तीन हजारांहून अधिक प्रकारचे कापड व वस्त्र प्रावरणे येथे तयार होतात. शुटिंग-शर्टिंग, ड्रेस मटेरिअल, केंब्रिक, मलमल, प्रिंटेड साड्या, लुंगी, धोती, विविध प्रकारची उपरणी, टॉवेल, पडद्यांचे कापड, त्याचबरोबर अलीकडील काळात टेक्निकल टेक्स्टाईलमधील काही उत्पादने येथे तयार होऊ लागली आहेत. याला इचलकरंजीतील उद्योजकांचे आणि व्यापाऱ्यांचेही परिश्रम आणि योगदान कारणीभूत आहे. एकविसाव्या शतकामधील जागतिकीकरणाच्या स्पर्धेत येथील वस्त्रोद्योग टिकावा म्हणून तत्कालीन वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांनी शासनाच्या माध्यमातून २३ कलमी पॅकेजसारख्या आणलेल्या योजना आणि त्याचा येथील उद्योजकांनी उठविलेला लाभ यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच डीकेटीई या वस्त्रोद्योगाचे तंत्रशुद्ध शिक्षण देणाऱ्या संस्थेमुळे शहरातील वस्त्रोद्योगामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. याचा परिणाम म्हणून इचलकरंजीत तयार होणारे दर्जेदार कापड, सूत आणि तयार कपडे सहजपणे निर्यात होऊ लागले आहे. टाऊन आॅफ एक्सलन्सचे फायदेनिर्यातदार शहरांच्या संगणक पटलावर इचलकरंजीचा समावेश.उत्पादकांना समूह बॅँक गॅरंटीच्या सुविधेवर निर्यातीची सुलभ संधी.बड्या व्यापाऱ्यांऐवजी छोट्या-छोट्या कापड उत्पादकांकडून थेट जागतिक बाजारात उत्पादने धाडण्याची सुविधा.निर्यातीमुळे सूत, कापड, तयार कपडे, आदींचे मूल्यवर्धन आणि अधिक नफा.एक खिडकी योजनेप्रमाणे निर्यातदारांना सरकारकडून निर्यातीचा थेट परवाना.कपड्याबरोबर हुपरीयेथील चांदीच्या दागिन्यांना आणि इंजिनिअरिंग उद्योगातील उत्पादनांना निर्यातीची संधी.
‘टाऊन आॅफ एक्स्पोर्ट एक्सलन्स’मुळे इचलकरंजी जागतिक पटलावर
By admin | Updated: January 1, 2015 00:34 IST