संतोष तोडकर -- कोल्हापूर आजोबांकडून मिळालेला शास्त्रीय संगीताचा वारसा, आई-वडिलांचे प्रोत्साहन यामुळे लहानवयातच तबल्याशी मैत्री झाली. त्यातनूच पुढे संगीत क्षेत्र मी करिअर म्हणून निवडले, अशी प्रतिक्रिया तरुण तबलावादक साहेबराव सनदी याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.लखनौ, उत्तर प्रदेश येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील शास्त्रीय संगीत स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या साहेबराव सनदी याला मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते ‘यंग तबला नवाज आॅफ इंडिया २०१५’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लखनौ येथे स्टेट बॅँक आॅफ इंडिया व संगीत मिलन या संस्थेने या स्पर्धेचे आयोजन केले होते. महाराष्ट्रासह एकूण बारा राज्यांतून आलेल्या अठरा स्पर्धकांमधून सनदी याची तबला वादनासाठी अंतिम विजेता म्हणून निवड करण्यात आली. साहेबराव सांगतो, ‘आजोबांना भजनाची आवड होती. ते उत्तम शास्त्रीय गायकही होते. घरी संगीताचे वर्ग चालायचे. त्यामुळे घरात निरनिराळी वाद्ये दिसायची. माझे बालपण तानपुरा, हार्मोनियम, तबला या वाद्यांच्या सहवासात गेले. मुले ज्या वयात क्रिकेट खेळत असत, त्यावेळी मी वाद्यांवर वेगवेगळे प्रयोग करण्यात दंग असे. आजोबांचा संगीत साधनेचा वारसा पुढे चालावा, अशी आई-वडिलांची इच्छा असल्याने त्यांनी मला नेहमी प्रोत्साहनच दिले. वयाच्या पाचव्या वर्षांपासून पंडित वामनराव मिरजकर यांच्याकडे तबला वादनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. शालेय जीवनात मुख्याध्यापिका सुमित्रा जाधव यांचे प्रोत्साहन लाभले. वयाच्या सातव्या वर्षी शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये तबला वाजविण्याची संधी मिळाली. वयाच्या बाराव्या वर्षी ‘सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अॅँड ट्रेनिंग’ या संस्थेची शिष्यवृत्ती मिळाल्याने माझा आत्मविश्वास वाढला, असे तो सांगतो. साहेबरावने गुणीदास संगीत विद्यालयात २००५ पासून राजप्रसाद धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले. सध्या पुण्यातील तालयोगी आश्रम गुरुकुल येथे पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडे तो शिक्षण घेत आहे.अनेक ठिकाणी संधीकोल्हापूर महोत्सव, राजर्षी शाहू ग्रंथ महोत्सव, तालयात्रा, कोल्हापूर व सांगली आकाशवाणी, दूरदर्शनवरील ‘वा रे वा’ या कार्यक्रमात मला तबला सादरीकरणाची संधी मिळाली असल्याचे साहेबराव यांनी सांगितले.
घरची साथ म्हणूनच तबला वादनाची कास
By admin | Updated: December 29, 2015 00:44 IST