गडहिंग्लज : सेवानिवृत्त कामगारांची थकीत देणी मिळावीत, यासाठी कारखान्याचे निवृत्त कामगार आंदोलन करीत आहेत. त्यांची देणी देण्यासाठी कारखाना संचालक मंडळ आणि ब्रिक्स इंडिया कंपनीच्या प्रतिनिधींची येत्या तीन दिवसांत संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी संचालकांनी कारखाना अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली. निवेदनात म्हटले आहे, काही कामगारांनी कारखाना व कंपनीच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला होता. त्याचा निकाल न्यायालयाने दिला असून, कंपनीने कारखाना चालविण्यास घेतलेल्या दिवसापासून व त्यापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या सर्व कामगारांची थकीत देणी कंपनीने द्यावीत, असा न्यायालयाचा आदेश आहे. मात्र, कंपनीने अद्याप सेवानिवृत्त कामगारांची देणी दिलेली नाहीत.
कारखान्याचे सर्व संचालक निवृत्त कामगारांची देणी देण्याबाबत आणि सर्व सहकार्य करण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे संचालक मंडळ व कंपनी प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेण्यात यावा.
निवेदनावर, संचालक प्रकाश चव्हाण, संभाजी नाईक, सदानंद हत्तरकी, किरण पाटील, क्रांतीदेवी कुराडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.