मुरगूडजवळ असलेल्या शिंदेवाडी गावचे माजी सरपंच दत्तामामा खराडे हे सहाव्यांदा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आहेत. १९८९ मध्ये वयाच्या ४५ व्या वर्षी खराडे पहिल्याच संधीत ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येत, सरपंच पदावर विराजमान झाले. त्यानंतर पाच वर्षांचा अपवाद वगळता ते आजतागायत शिंदेवाडी ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडून येत आहेत. त्यापैकी वीस वर्षे त्यांनी सरपंचपद व पाच वर्षे उपसरपंचपद भूषविले आहे. कागल तालुक्यामध्ये सर्वत्र महाविकास आघाडीचा बोलबाला असताना त्यांनी मंडलिक गटाच्या साथीने नऊपैकी आठ जागा जिंकत निर्विवाद यश मिळविले आहे.
खराडे यांनी यापूर्वी बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्षपद भूषविले असून सध्या ते संचालक आहेत. तसेच त्यांनी गडडिंग्लज बाजार समितीचे चेअरमनपदही सांभाळले आहे. त्याशिवाय गावातील शाहू दूध संस्थेचे चेअरमन असून श्रीराम सेवा संस्थेचे संचालक आहेत. कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष असून गावात नवजवान तरुण मंडळाची स्थापना करून त्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.
विशेष म्हणजे या गावामध्ये शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका सुहासिनीदेवी घाटगे, शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजित घाटगे, नवोदिता घाटगे यांचे मतदान असल्यामुळे या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते .
फोटो
दत्तामामा खराडे