हातकणंगले तालुक्याच्या विभाजनाचा प्रश्न गेली पंधरा वर्षे रेंगाळला आहे. हातकणंगले तालुका क्षेत्रफळ, लोकसंख्या व महसुलाच्या बाबतीत जिल्ह्यात अव्वल आहे. तालुक्याच्या वाढलेल्या व्यापामुळे प्रशासनावरही ताण वाढला असून, यामुळे जनतेच्या कामाची दिरंगाई होत आहे. शासकीय कामासाठी निलेवाडीपासून जंगमवाडीपर्यंतची जनता तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारून वैतागली आहे. तालुक्यातील सामान्य जनतेला हवा आहे स्वतंत्र पेठवडगाव तालुका. हातकणंगले तालुक्याच्या विभाजनाच्या प्रश्नावर प्रकाश टाकणारी मालिका आजपासून...दिलीप चरणे - नवे पारगाव -महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीसह निलेवाडी ते जंगमवाडी असे ६७ किलोमीटर अंतराचे टोक असणारा हातकणंगले तालुका हा सर्वार्थाने अव्वल तालुका म्हणून ओळखला जातो. सहकार, व्यापार, उद्योग, शिक्षण, शेती, पर्यटन, आदी क्षेत्रातील प्रगतीमुळे हातकणंगले तालुक्याने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. वाढलेली लोकसंख्या, तालुक्याचा विस्तार यामुळे हातकणंगले तालुक्याच्या प्रशासनावर प्रचंड ताण असल्यामुळे नागरीकांची गैरसोय होत असून, गेली पंधरा वर्षे हातकणंगले तालुक्याच्या विभाजनाची मागणी जोर धरत आहे. जनहिताचा विचार होऊन पेठवडगाव व इचलकरंजी असे दोन स्वतंत्र तालुके होण्याची गरज आहे.हातकणंगले तालुक्यात ६२ गावे असून, ५९.८.८ चौ. कि. मी. क्षेत्रफळ आहे. ७ लाख ९ हजार ६२८ लोकसंख्या असून, पेठवडगाव व इचलकरंजी या दोन नगरपरिषदा आहेत. अडीच ब्लॉकचा तालुका असून, दोन विधानसभेचे मतदारसंघ आहेत. न्यायदंडाधिकारी वर्ग-१ व कनिष्ट न्यायाधीश यांची सात न्यायालये आहेत. महसूल मंडले आठ असून, पोलीस ठाणी सहा आहेत. सरकारी दवाखाने, शाळा, महाविद्यालये, बँका, पतसंस्थांसह सहकारी पतसंस्था व पाणीपुरवठा संस्थांचे जाळे पसरले आहे.पेठवडगावचा व्यापार, इचलकरंजीचे सूत व हुपरीची चांदी ही या तालुक्याच्या अर्थकारणाची मोठी जमेची बाजू मानली जाते. शिरोलीच्या औद्योगिक वसाहतीने ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. इचकरंजीचा ‘पंचगंगा’, हुपरीचा ‘जवाहर’ व नरंदेचा ‘शरद’ या सहकारी साखर कारखान्यांचा तालुक्याच्या विकासात वाटा आहे.इचलकरंजी व त्या परिसरातील नागरिकांनी इचलकरंजी येथे स्वतंत्र तालुक्याचे ठिकाण असावे, अशी मागणी यापूर्वीच शासनाकडे केली आहे. ही मागणी न्याय असल्याने पेठवडगाव परिसरातील जनतेसही मान्य आहे. इचलकरंजी तालुका वेगळा होणार असल्याने उर्वरित गावांनी (पेठवडगाव परिसर) हातकणंगले हे तालुक्याचे ठिकाण अत्यंत गैरसोयीचे होणार असून, जनतेला आर्थिक फटका बसणारे आहे. पेठवडगाव हे ठिकाण तालुक्याचे ठिकाण झाल्यास विशेष करून पश्चिम-उत्तरेकडील गावांना पर्यायाने जनतेस अत्यंत सोयीचे होणार असून, खर्चात बचत करणारे आहे.पेठवडगाव या ठिकाणी मोठी बाजारपेठ, न्यायालय, बाजार समिती, तालुका खरेदी-विक्री संघ, पाटबंधारे खाते, नगरपरिषद, पोलीस ठाणे, बसस्थानक, विद्युत कार्यालय, भू-मापन कार्यालय, दूरध्वनी कार्यालय, आदी शासकीय यंत्रणा कार्यरत आहे. मेडिकल कॉलज, डी. फार्मसी, बी. फार्मसी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, डी. एड., बी. एड., अभियांत्रिकी महाविद्यालयांबरोबरच सराफी पेठही आहे. वरीलप्रमाणे इचलकरंजी येथेही अशा सुविधा उपलब्ध असल्याने इचलकरंजी तालुका झाल्यास परिसरातील जनतेला चांगल्याच सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. हातकणंगले तालुक्यातील जनतेच्या भावनांची कदर होऊन तालुका विभाजनाची गरज आहे. (क्रमश:)
‘हातकणंगले’चे विभाजन होणार तरी कधी
By admin | Updated: May 12, 2015 23:42 IST