सरदार चौगुले -- पोर्ले तर्फ ठाणे --गल्लीपासून दिल्लीपर्यंतची कोणतीही निवडणूक असू दे, त्या कामगारांवर राजकीय दबाव असायचा. राजकीय संघर्षामुळे नोकरीपासून दूर व्हावे लागू नये यासाठी त्यांचे सत्तेपुढे शहाणपण चालत नसे. आता मात्र साखर कारखान्याचे खासगीकरण झाल्याने त्यांच्यावर राजकीय दबाव नाही की, मतदानासाठी अडवणूक नाही. आसुर्ले-पोर्ले येथील पूर्वाश्रमीच्या दत्त साखर कारखान्यातील कामगारांबाबत हे घडले आहे. पूर्वी या कारखान्यात राजकीय विषयावर बोलायला बंदी होती. आता अशी चर्चा सुरू आहे. आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त साखर कारखाना दालमिया शुगर कंपनीने खरेदी केला. कंपनीला राजकारणाऐवजी व्यवसाय करायचा आहे. त्यामुळे या कारखान्याचे कामगार राजकारणाबाबत मुक्त आहेत. प्रत्येकाला त्याच्या मर्जीप्रमाणे पक्षाचा झेंडा हातात घेता येत आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील आसुर्ले-पोर्ले, दत्त साखर कारखाना १९८३ मध्ये सहकारातून उभारला. या कारखान्यास तीन तालुक्यांतील ८० गावांचे कार्यक्षेत्र लाभले आहे. कारखान्यांच्या इतिहासात अनेक बऱ्या-वाईट घडामोडी घडल्या. त्या सहकार क्षेत्राला ज्ञात आहेत. कारखाना लिलावात निघाला. तो दालमिया शुगर कंपनीने घेतला.पूर्वी पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील विकासाचा केंद्रबिंदू म्हणून बिरदेवाच्या माळावर नावारूपाला आलेल्या या रोपट्याने ८० गावांत आपली राजकीय पाळंमुळं रोवली. या गावात सहकारी संस्था, ग्रामपंचायत निवडणुकीत कारखान्याच्या नावाचा एक गट तयार झाला. साखर कारखान्यामुळे कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांमध्ये कारखान्याचे राजकारण घुसल्याने सहकारी संस्था मोडीत निघाल्या. शह-काटशहाच्या राजकारणाने गट-तट निर्माण झाले.गावपातळीवर सहकारी संस्थांमध्ये निवडणुकीत उमेदवार मिळाला नाही की, कारखान्यातील कामगारांवर दबाव आणायचा आणि निवडणूक लढविण्यासाठी त्यांना भाग पाडायचे. नोकरीच्या भीतीपोटी इच्छा नसतानाही त्यांना निवडणूक आखाड्यात उतरावे लागे. विरोधी गटातील कामगाराला मतदान करण्यासाठी धमकी द्यायची अथवा त्याला मतदान करू द्यायचे नाही. हे नाही जमलं तर बदलीची कारवाई करून इतरांवर दबाव आणायचा. त्यामुळे कामगारांना मूग गिळून गप्प राहावे लागे. जरा वळवळ करणाऱ्यांची तर नोकरीतून कायमची हकालपट्टी ठरलेली. काही स्वाभिमानी कामगारांनी दबाव नको म्हणून नोकरी सोडल्याची उदाहरणेही आहेत.या कारखान्यावर ३० वर्षांत बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. गणपतराव सरनोबत यांनी स्थापन केलेल्या या साखर कारखान्यावर चारवेळा सत्ता पालट झाली. उगवत्या सूर्याला नमस्कार करीत कामगारांनी दबावाखाली काम केले; पण दोन वर्षांपूर्वी दिल्लीच्या दालमिया कंपनीने अवसायानात निघालेला हा कारखाना खरेदी करून कारखान्याला राजकीय मुक्तता दिली. त्यामुळे राजकीय अड्डा असणाऱ्या कारखान्यावर आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणतीही निवडणूक असू दे, येथील कामगार राजकीय दबावापासून मुक्त झालेला दिसतो.
दत्त कारखान्यातील राजकारणाला मूठमाती
By admin | Updated: October 14, 2014 23:23 IST