संजय पाटील. देवाळे वार्ताहर : ग्रामीण भागात विद्युत तारा तुटणे, सडलेले खांब मोडणे, विद्युत तारांचा करंट जमिनीत उतरने आधी प्रकरणात वाढ होऊनही विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे ग्रामीण भागात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. विजेचा धक्का बसून अनेक शेतकऱ्यांना प्राण गमवावा लागला आहे. तरीही वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. सध्या पावसाळ्यामध्ये झुडपे वेलींचा प्रवास थेट विद्युत वाहक तारापर्यंत पोहोचल्याने धोका निर्माण झाला आहे. याकडे महावितरण लक्ष देईल काय? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. परिसरातील विद्युत खांब दुर्घटनांचे आगरच बनले आहे, पावसाच्या पाण्याने गंजून गेलेले जुने खांब कधी कोसळतील हे सांगता येत नाही अनेकदा खांब बदलण्याची मागणी करूनही वीज वितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केले आहे. अनेक ठिकाणचे वादळी वाऱ्यामुळे कललेले खांब धोकादायक बनले आहेत. विद्युत पुरवठा सुरू असलेल्या या खांबावरील वाहिन्या सहज हाताला लागतील अशा स्थितीत आहेत. हा भाग वारणा नदीकाठावरील असल्याने या ठिकाणी ऊस पिकांचे विक्रमी उत्पादन घेतले जात असून, या ऊस पिकामधून लोमकाळणाऱ्या तारा दिसून येत नाहीत याकडे कर्मचाऱ्यांनी वेळीच लक्ष न दिल्याने ऊस पिकाचा प्रवास मुख्य विद्युत वाहिकेपर्यंत सुरू असतो अनेक ठिकाणचे खांब वेलीने गुरफटून गेले आहेत. यामुळे शेतकरी,गुराखी यांचे प्राणी गेले असून अनेकांचे प्राण जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. उसाच्या शेतामध्ये विद्युत तारा तुटून पडल्यामुळे केखले(ता.पन्हाळा) येथील अनुबाई गिरवे यांना जीव गमवावा लागला तर माले (ता.पन्हाळा) येथील बाबासो पाटील व राजवर्धन पाटील या बाप लेकांचा दुर्दैवी बळी गेला. अशा दुर्घटना घडत असूनही महावितरण याकडे दुर्लक्ष करीत आहे. तेव्हा वीज वितरण कंपनीने या गंभीर बाबींचा विचार करून तात्काळ उपाययोजना करावी व संभाव्य हानी टाळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
ग्रामीण भागात विद्युत वितरण कंपनीचा गलथान कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:40 IST