यड्राव : येथील दि न्यू हायस्कूलमध्ये दहावीनंतर शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी पाचशे रुपयांची सक्ती केल्यामुळे पालक व व्यवस्थापनामध्ये वादावादीचे प्रकार घडले. मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी नाईलाजास्तव पाचशे रुपये द्यावे लागत असल्याने पालक संतप्त झाले आहेत. जि. प.च्या माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी यांनी शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी पैसे घेण्याची तरतूद नसल्याचे स्पष्ट केले.येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर शिक्षण संस्थेच्या दि न्यू हायस्कूलमध्ये आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण देण्यात येते. पुढील शिक्षणाची या ठिकाणी सोय नाही. प्रामुख्याने या ठिकाणी रोजंदारी करणारे, कष्टकरी यंत्रमाग कामगार यांच्यासारख्या सर्वसामान्य आर्थिक परिस्थिती असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात.नुकताच दहावी शालांत परीक्षेचा निकाल लागल्याने विद्यार्थी व पालक पुढील शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या प्रवेश प्रक्रियेच्या कागदपत्रांच्या पूर्ततेत आहेत. प्रवेश प्रक्रियेमध्ये शाळा सोडल्याचा दाखला महत्त्वाचा असतो, हे जाणून शाळा व्यवस्थापनाकडून प्रत्येक विद्यार्थ्याकडून पाचशे रुपये सक्तीने घेऊन दाखला देण्यात आला. पालकांनी बराच विरोध केला; परंतु मुलांच्या प्रवेश प्रक्रियेत अडचण येऊ नये व भवितव्यासाठी पैसे द्यावे लागल्याने पालक संतप्त झाले आहेत. या प्रकारामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. (वार्ताहर)
पाचशे रुपये द्या अन् दाखला घेऊन जा !
By admin | Updated: July 15, 2014 00:30 IST