राम करले = बाजारभोगाव -चिखलाच्या बांधकामात लावलेलं दगड... त्यावर ऊभी असणारी कुजक्या लाकडाची भिंत... छतावर पसरलेल्या गवताच्या पेंड्या, सोबतीला फाटका कागद... धो-धो पावसात व वादळी वाऱ्यात उभं असणारं डोंगरातील ‘फाटक’ छप्पर... हेच त्यांच हक्काच ‘घरकुल’.. प्रशासनाकडून ‘घर’ बांधून देण्याच आश्वासन एक स्वप्नच राहिल आहे. पोंबरेतील वानरमारे समाजातील कुटुंबाची ‘साडेसाती’ संपलेली नाही. तीन दगडाच्या पेटलेल्या चुलीची ‘ऊब’ त्यांना प्रशासनाच्या नाकर्तेपणाचे चटके देत आहे.पन्हाळा तालुक्यातील पोंबरे येथे चार कि. मी. अंतरावर असणाऱ्या तांबटीच्या जंगलात गेले चौदा वर्षे वानरमारे समाजाची तीन कुटुंबे राहत आहेत. कुटुंबामध्ये वीस जणांचा समावेश आहे. पोटाची आग विझवण्यासाठी ना रोजगार ना हक्काचा पसाभर जागा. फुटकी भांडी, दांडे तुटलेले कप, खुंटीला अडकलेली कापडी गाठोळी आणि तीन दगडाची चुल, हाच त्यांचा संसार दिवसभर जंगल परिसरात भटकायचे, कंदमुळे गोळा करायची. गाव परिसरातील लोकांना विकायची. मिळालेले चार पैसे संसाराच्या गाड्याला ठेवायचे एकवेळ पोटभर जेवायचे. एकवेळ उपाशी झोपायचे असा त्यांचा नेहमीचाच दिनक्रम आहे.छप्पर कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने वानरमारे कुटुंबातील पुरुष मंडळी रात्रीच्यावेळी ‘जागरण’ करुन कुटूंबाचे संरक्षण करतात. डोंगरात छप्पर अल्याने वन्यप्राण्यांचा उपद्रवही त्यांना नित्याचा बनला आहे. रात्रीच्यावेळी गवारेडे छप्पराशेजारुन धुम ठोकत आहेत. हलाखीच्या परिस्थितीतही ही वानरमारे कुटुंबे जगण्यासाठी संघर्ष करत आहे. एकवेळचे पोट भरणे हा ज्यांच्यासमोर मोठा प्रश्न असताना हक्काची पक्की घरे बांधणे म्हणजे त्यांच्यासाठी दिवास्वप्ने होय. प्रशासनाकडून वारंवार मोफत घरे बांधून देण्याच्या आश्वासनाशिवाय त्यांच्या पदरी काहीच मिळालेलं नाही. त्यामुळे ‘भटकंती’ हा शब्दच त्यांच्या संसाराचा मुळ गाभा आहे. (क्रमश)वानरमारे समाजाचीसाडेसाती : भाग - १
‘फाटक’ छप्पर... हेच त्यांच हक्काच ‘घरकुल’
By admin | Updated: August 12, 2014 23:22 IST