गांधीनगर : गडमुडशिंगी - वसगडे बससेवा त्वरित सुरू करा, अशी मागणी जागर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बी. जी. मांगले व प्रभात पार्टीचे जिल्हाध्यक्ष भीमराव गोंधळी यांनी महानगरपालिकेचे अप्पर आयुक्त नितीन देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील केएमटी बससेवा बंद केली होती. त्यातील बरेच मार्ग आता पुन्हा सुरू केले आहेत. त्यामध्ये करवीर तालुक्यातील मुडशिंगी - वसगडे हा मार्ग अद्याप बंद आहे. तो आता पूर्ववत चालू करणे गरजेचे आहे. पूर्व भागातील या मार्गावर उचगाव, गडमुडशिंगी, वसगडे ही मोठी गावे येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी केएमटीने प्रवास करत असतात. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून बससेवा बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे केएमटी बससेवा त्वरित सुरू करावी, अशी मागणी मांगले व गोंधळी यांनी केली.
फोटो ओळ ०३ गडमुडशिंगी बससेवा
गडमुडशिंगी - वसगडे बससेवा त्वरित सुरू करा या मागणीचे निवेदन महानगरपालिकेचे अप्पर आयुक्त नितीन देसाई यांना देताना बी. जी. मांगले, भीमराव गोंधळी व कार्यकर्ते उपस्थित होते.