गडहिंग्लज : प्रशासक मंडळातील सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीला ऊर्जितावस्था देण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करू, अशी ग्वाही प्रशासक मंडळाचे अध्यक्ष अभय देसाई यांनी दिली. ऑगस्टमध्ये संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर भुदरगडच्या सहायक निबंधकांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर शासनाने अशासकीय प्रशासक मंडळ नेमण्याचा निर्णय घेतला. जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार प्रशासक मंडळाने सोमवारी (दि.१४) सूत्रे स्वीकारली. देसाई म्हणाले, गडहिंग्लज बाजार आवारातील शेतीमालाची आवक कमी झाल्याने बाजार समिती आर्थिक अरिष्टात सापडली आहे. त्यामुळे खर्चातील काटकसरीबरोबरच कायमस्वरूपी उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्याची गरज आहे. त्यादृष्टीने तुर्केवाडी बाजार आवाराला चालना देण्याचा आपला प्रयत्न राहील. प्रशासक मंडळ सदस्य कॉ. संपत देसाई, मुकुंद देसाई, सोमगोंडा आरबोळे, सुनील शिंत्रे यांचीही भाषणे झाली.
यावेळी प्रशासक मंडळ सदस्य राजेंद्र गड्यान्नावर, जयकुमार मुन्नोळी, भीमराव राजाराम, जानबा चौगुले, धनाजी तोरस्कर, रोहित मांडेकर, राजशेखर यरटे, विक्रम चव्हाण-पाटील, संजय उत्तूरकर, दिग्विजय कुराडे, संभाजी पाटील, प्रभाकर खांडेकर, दिनकर भोकरे, दिलीप माने, लगमाण्णा कांबळे, विजय वांगणेकर, आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळी : गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बाळासाहेब चव्हाण यांनी प्रशासक मंडळाचे अध्यक्ष अभय देसाई यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सर्व सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.
क्रमांक : १४१२२०२०-गड-०८