राम मगदूम - गडहिंग्लज .बांधकाम सभापती नरेंद्र भद्रापूर पुन्हा विरोधी जनता दल-जनसुराज्य-काँगे्रस आघाडीत परतले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची सत्ता पुन्हा काठावर आली असून, नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडीत सत्ता टिकविण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर उभे ठाकले आहे.अडीच वर्षांपूर्वी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत तत्कालीन सत्ताधारी जनता दल-जनसुराज्य आघाडीला हटवून राष्ट्रवादी सत्तेवर आली. १७ पैकी राष्ट्रवादीला ९, तर विरोधी आघाडीला ८ जागा मिळाल्या. त्यापैकी भद्रापूर हे ‘जनुसराज्य’चे आहेत.नगरपालिका शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत भद्रापूर यांनी साथ दिल्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ दहा झाले. दोन वर्षे ते राष्ट्रवादीसोबतच राहिले. त्याबदल्यात राष्ट्रवादीने त्यांना सहा महिन्यांपासून बांधकाम सभापतिपद दिले आहे. मात्र, निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नसल्याची तक्रार उघडपणे करत त्यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला होता.दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सांगण्यावरून ते पुन्हा सभापतिपदाच्या खुर्चीत बसले होते. परंतु, त्यानंतरही ‘कारभाऱ्यांशी’ त्यांचा सूर जुळला नाही. त्यामुळे सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर विरोधकांना साथ देत त्यांनी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांची कोंडी करायला सुरुवात केल्यामुळे राष्ट्रवादी व त्यांच्यात दुरावा निर्माण झाला.आठवड्यापूर्वीच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत श्री लक्ष्मी मंदिराच्या आवारातील प्राथमिक शाळेसाठी आरक्षित जागेवर प्रस्तावित वैदिक शाळेच्या मुद्द्यावरून त्यांनी राष्ट्रवादीची चांगलीच कोंडी केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते, देवस्थान समिती व शिक्षण मंडळ सभापती सुरेश कोळकी यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांचे जोरदार खंडनही त्यांनी पुराव्यानिशी केले. त्यामुळे कोळकींबरोबरच राष्ट्रवादीचे नेते व कारभारीही अडचणीत सापडले आहेत. त्याचा फटका नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे.
‘गडहिंग्लज’ पालिकेत राष्ट्रवादी पुन्हा काठावर !
By admin | Updated: July 10, 2014 01:03 IST