इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीजवळील नाईक मळ्यात एका विहिरीत रविवारी चार मोटारसायकली शिवाजीनगर पोलिसांना आढळल्या. याबाबतची नोंद पोलिसांत झाली आहे. विहिरीतील पाणी कमी झाल्याने हा प्रकार उघडकीस आला.
जुन्या हुपरी रस्त्यावर असलेल्या नाईक मळ्यात राजेश दिग्विजय नाईक यांची विहीर आहे. रविवारी सकाळी त्यांना विहिरीतील पाणी कमी झाल्याने एक मोटारसायकल दिसून आली. त्याची माहिती पोलिसांना समजल्याने ते घटनास्थळी आले. या शोधमोहिमेत आणखीन तीन मोटारसायकली मिळून आल्या. चाके, बॅटरी नसल्याने केवळ मोटारसायकलींचा सांगाडाच आढळून आला. त्यामध्ये एक मोटारसायकल चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले आहे. अन्य मोटारसायकली चोरून त्या विहिरीत टाकल्या असाव्यात, असा पोलिसांनी अंदाज वर्तवला. यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद मगर, भागवत मुळीक, गजानन बरगाले, प्रकाश कांबळे, विजय माळवदे व वीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी सहभाग घेतला.