कोल्हापूर : सातत्य, प्रामाणिकपणा, वेळेचे नियोजन आणि अपार कष्ट या जोरावर कोल्हापुरातील शिवाजी पेठ येथील अजिंक्य पोवार यांनी भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदापर्यंत मजल मारली आहे. ध्येयाची निश्चिती, मनाची आणि कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास यश हे मिळतेच असे अजिंक्य पोवार यांनी आज, सोमवारी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितले.शिवाजी पेठेतील रंकाळा स्टॅँड परिसरातील एका सर्वसामान्य कुटुंबात अजिंक्य यांचा १४ एप्रिल १९९१ला जन्म झाला. वडील अरविंद पोवार एका कंपनीत नोकरीतून निवृत्त झालेले. आई अनुराधा गृहिणी, लहान भाऊ अमित हा सध्या न्यू कॉलेजमध्ये बी.ए.च्या तिसऱ्या वर्षात शिकतो. तो शिवाजी तरुण मंडळाचा फुटबॉल खेळाडू आहे. याशिवाय भक्कम पाठबळ देणारे पाच चुलते व मामा आहेत.लेफ्टनंट पदापर्यंतच्या वाटचालीविषयी ते म्हणाले, आपले प्राथमिक शिक्षण आदर्श विद्यालय, तर माध्यमिक शिक्षण महाराष्ट्र हायस्कूलमध्ये झाले. यानंतर पूर्व परीक्षेत उत्तीर्ण होऊन इयत्ता पाचवीला सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये निवड झाली. या ठिकाणीच आपल्याला सैन्यदलाविषयी प्राथमिक माहिती व आवड निर्माण झाली. यावेळीच आपण सैन्य दलातील मोठे अधिकारी व्हायचे असे ठरविले. त्यादृष्टीनेच आपला विचार राहिला. बारावीपर्यंत सैनिक स्कूलमध्ये शिक्षण झाले. बारावीनंतर २००८ मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)ची परीक्षा दिली. ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो; परंतु वैद्यकीय चाचणीत अडचण आल्याने यावेळी निवड होऊ शकली नाही. २००९मध्ये आपण कोल्हापुरातील भारती विद्यापीठात इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनला प्रवेश घेतला. डेहराडून येथील एक वर्षाच्या खडतर प्रशिक्षणानंतर १३ डिसेंबरला आपल्याला दीक्षांत समारंभात राष्ट्रपतींच्या सहीचे प्रमाणपत्र मिळाले. तो क्षण आपल्या आनंदाचा सर्वोेच्च क्षण होता. प्रशिक्षणाविषयी ते म्हणाले, आपला दिवस पहाटे ५ वाजता सुरू व्हायचा. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना रिपोर्टिंग, शारीरिक व्यायाम, घोडेस्वारी आदी आवरल्यानंतर दुपारी युद्ध अभ्यासाचे तास, सायंकाळी मैदानी खेळ, रात्री पुन्हा अभ्यासाचे तास असे दैनंदिन नियोजन होते. सध्याच्या पिढीने अपार कष्टाची तयारी ठेवावी, आपल्या आवडीच्या क्षेत्रात उच्च टोक गाठून देशाचे नाव उज्ज्वल करावे. आपले स्वत:चे आणि आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. भारतीय सैन्यदलातही सेवेच्या अनेक संधी आहेत. २०१३मध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर आॅक्टोबर २०१३ला दिलेल्या परीक्षेत आपल्याला यश येऊन देशात आपल्याला सहावा क्रमांक मिळाला. टेक्निकल अभ्यासक्रमात देशातून ६० जणांची निवड झाली. त्यामध्ये महाराष्ट्रातून आपण एकमेव आहे. आपले बरेच मित्र हे सैन्यात आहेत. त्यांनी मला नेहमीच प्रोत्साहित केले. त्यामुळे आपल्यातील जोश वाढला आणि आपण हे ध्येय साध्य करू शकलो.
पहिले अपयश ते ‘लेफ्टनंट’ पदापर्यंत
By admin | Updated: December 23, 2014 00:41 IST