जहाँगीर शेख - कागल -सत्ताधारी दोन्ही कॉँग्रेस पक्षांबद्दल जनतेत निर्माण झालेली विरोधी लाट, १५ वर्षे मंत्रिपदामुळे लोकांमध्ये अॅन्टीइन्कमन्सी निर्माण होण्याचा धोका, लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिकांना कागल मतदारसंघातून नऊ हजार मतांचे मिळालेले मताधिक्य, दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कर्मचाऱ्यांमध्ये सत्तेच्या लाभाबद्दल निर्माण झालेले मतभेद, अर्थपूर्ण चर्चेमुळे झालेली बदनामी, अशा अनेक संकटांच्या चक्रव्यूहात सापडलेल्या हसन मुश्रीफांनी अखेर ५९३४ इतक्या मतांनी संजय घाटगेंना पराभूत केले. गटा-तटाच्या पलीकडे जाऊन मुश्रीफांनी जी कामे केली, त्यामुळे हे चक्रव्यूह भेदता आले, अन्यथा पराभूत दिग्गजांच्या यादीत आणखीन एक नाव वाढले असते. अजूनही गटा-तटाच्या राजकारणाला अनन्यसाधारण महत्त्व देणाऱ्या कागल तालुक्यात मंडलिक-संजय घाटगे असे दोन प्रबळ गट विरोधात ठोकलेले. कागल तालुक्याचा विचार केला, तर अवघ्या दीड-दोनशे मतांमध्ये मुश्रीफ-घाटगे अशी विभागणी झाली. गटाचे राजकारण अजून किती गडद आहे, याचेच हे उदाहरण आहे. नारायण राणे, सतेज पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासारखे दिग्गज मंत्री पराभूत झाले. सलग तीनवेळा पराभव झालेल्या संजय घाटगे यांच्याबद्दल सहानुभूतीची हवाही काही प्रमाणात होती. मात्र, सातत्याने पूर्णवेळ राजकारण करीत मुश्रीफांनी इतर ठिकाणांप्रमाणे आपल्या मतदारसंघात आपल्या विरुद्ध खदखद निर्माण होऊ दिली नाही. ज्येष्ठ नेते विक्रमसिंह घाटगे यांची असलेली प्रतिमाही त्यांना उपयोगी पडली. समरजितसिंह घाटगे, मुरगूडकर पाटील बंधू यांनी जाहीर सभांमधून मंडलिक ,संजय घाटगे यांना दिलेले प्रत्युत्तरही राजेखान जमादारसारख्या अस्त्राची मारकता कमी करण्यात उपयोगी ठरले. जातीयवादी प्रचार एका बाजूला झाला असला, तरी त्यामुळे इतर काही मतांचेही धु्रवीकरण झाले. मंडलिक-मुश्रीफ या गुरू-शिष्यांच्या संघर्षात आज मंडलिक गट खासदारकीपासून वंचित झाला; पण मुश्रीफांनी आमदारकी शाबूत ठेवली. सलग चौथ्यांदा आमदार होणे तेही कागलच्या राजकीय विद्यापीठात ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे मताधिक्य हा मुद्दा गौण आहे. राहिला प्रश्न कोणी आत्मचिंतन करावे. संजय घाटगे गट, विक्रमसिंहराजे गट, मुरगूडकर पाटील बंधू, गडहिंग्लज उत्तूर विभागातील नेते, कार्यकेर्ते यांना आत्मपरीक्षण करण्याची कोणतीच गरज नाही. मात्र, आत्मपरीक्षणाची गरज मुश्रीफ गटाबरोबरच मंडलिक गटालाही आहे. आणि ते कशासाठी याचे उत्तर येत्या काही दिवसांतच समोर येईल. राजकारणात सत्तेचे पाणी उपसणारा मुश्रीफ गटइतक्या प्रचंड कामानंतरही सहा हजारांचेच मताधिक्यच! याचे शल्य मुश्रीफ गटाला वाटणे स्वाभाविकच आहे. मात्र, भराभर गटाचा विस्तार करताना बेशिस्त बनलेले कार्यकर्ते, नेत्यांनी दाखविलेल्या अतिसौजन्यामुळे निर्माण झालेली बेफिकीरी, सत्तेचा सहज फायदा मिळत गेल्याने त्याचे न समजलेले महत्त्व आणि सगळ्यात म्हणजे एक पांढरा शर्ट घातला आणि हातात मोबाईल घेऊन चौकात थांबले की मुश्रीफ होता येते ही कार्यकर्त्यांमध्ये भिनलेली कल्पना यामुळे मुश्रीफ गट म्हणजे राजकारणात सत्तेचे पाणी उपसणारा झरा, अशी ओळख बनली आहे.कुठे परशुराम तावरे, कुठे संतान बारदेस्करभाजप व कॉँग्रेस या राष्ट्रीय पक्षांच्या चिन्हांवर अनुक्रमे परशुराम तावरे आणि संतान बारदेस्कर लढत होते. तावरे यांनी ५५११ इतकी मते घेत भाजपचे अस्तित्व दाखविले. त्या तुलनेत बारदेस्कर हे १००० मतांपर्यंतच पोहोचू शकले. त्यामुळे या मतदारसंघात होती नव्हती तेवढीही पत राष्ट्रीय कॉँग्रेसने गमावली. हीच कॉँग्रेसची तिकीट वाटपाची संस्कृती आहे.
अखेर मुश्रीफांनी चक्रव्यूह भेदले...
By admin | Updated: October 22, 2014 00:25 IST