करंजफेण : ऊसतोड ठरलेल्या वेळेत होत नाही. तोडलेला ऊस वेळेत नेला जात नाही. या रागातून दत्त दालमिया कारखाना कर्मचारी असलेल्या एका शेतकऱ्याने कोतोली (ता. पन्हाळा) येथील गट कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून फर्निचरची मोडतोड केली.
कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून मनमानी कारभार सुरू असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. मात्र दालमिया प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. पाळी पत्रकाप्रमाणे ऊस तोडणी येऊनदेखील मर्जीतील लोकांची ऊसतोडणी केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. तर नोंदी करण्यासाठी मोबदला मागणी केली जात असल्याच्या देखील तक्रारी आहेत. तोडलेला ऊस कारखान्याला वेळेत घेऊन जात नसल्याच्या तक्रारी आहेत. दालमिया कर्मचारी असलेल्या एका शेतकऱ्याची ऊस तोडणी होऊनदेखील ऊस घेऊन जाण्यास टोलवाटोलव करीत असल्याच्या कारणाने कोतोली गट कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. अधिकाऱ्यासोबत बाचाबाची होऊन कार्यालयातील फर्निचरची मोडतोड करण्यात आली. कर्मचाऱ्यानेच मोडतोड केल्याने या प्रकरणाची परिसरात जोरदार चर्चा रंगलीय. याबद्दल प्रशासनाला विचारले असता दारूच्या नशेत मोडतोड झाल्याचे कारण पुढे करत प्रकरणावर पडदा टाकला जात आहे.
२२ दालमिया कोतोली तोडफोड
फोटो : दालमिया प्रशासनाच्या मनमानी कारभाराला कंटाळून शेतक-याने कोतोली गट कार्यालयातील फर्निचरची मोडतोड केली.