अशोक डोंबाळे / सांगलीअवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढल्यामुळे द्राक्ष बागायतदारांच्या स्वप्नांचा यंदा चक्काचूर झाला. खानापूर, तासगाव तालुक्यांतील सात हजार ५०० एकरांतील निर्यातक्षम द्राक्षांना तडे गेल्यामुळे, व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदीसह निर्यातीस नकार दिला आहे. युरोपीयन राष्ट्रांत ७५ रुपये किलोने विक्री होणाऱ्या या द्राक्षांना किरकोळ बाजारात १५ ते २० रुपये किलो इतका दरही कोणी द्यायला तयार नाही. त्यामुळे या दोन तालुक्यांतील २५० शेतकऱ्यांना सुमारे शंभर कोटींचा फटका बसला आहे.जिल्ह्यात एक लाख एकर द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. यापैकी दहा हजार एकरातील द्राक्षे युरोपीयन राष्ट्रांत दरवर्षी निर्यात होतात. तेथे चांगला दरही मिळतो. म्हणून खानापूर, तासगाव तालुक्यांतील शेतकरी निर्यातक्षम द्राक्षे पिकविण्याकडे वळला आहे. खूप कष्टातून द्राक्षबागाही उत्तम दर्जाच्या तयार केल्या. द्राक्षांची निर्यात होईपर्यंत शेतकरी पै-पाहुणे, यात्रा-जत्रांना दुय्यम स्थान देऊन, चोवीस तास बागेतच राबतात. औषधांवर तर लाखो रुपये खर्च होतो. परंतु, यावर्षी दि. १ व २ मार्च रोजी अवकाळी पावसाने संपूर्ण जिल्ह्यालाच झोडपून काढले. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार रब्बी पिकांसह ६५ हजार एकरांतील द्राक्षे, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळीच्या तडाख्यात द्राक्षबागायतदार मात्र पुरता उद्ध्वस्त झाला आहे. जिल्ह्यातून दहा हजार एकरातील द्राक्षांची निर्यात होणार होती. यापैकी २५ टक्केक्षेत्रातील म्हणजे केवळ २५० एकरांतील द्राक्षांची निर्यात झाली आहे. उर्वरित सात हजार ५०० एकरांतील द्राक्षांची निर्यात झालेली नसून, द्राक्षे बागेतच आहेत तोपर्यंतच अवकाळी पावसाचा तडाखा निर्यातक्षम द्राक्षांना बसला. या पावसामुळे द्राक्षांच्या मण्यांना मोठ्या प्रमाणात तडे जाऊन द्राक्षे खराब होऊ लागली आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर पळशी (ता. खानापूर) येथील दहा टन द्राक्षे निर्यात करायची म्हणून निर्यातदार व्यापारी विशाल जोशी यांनी कुलिंगसाठी अंजनी (ता. तासगाव) येथील शीतगृहात ठेवली होती. शुक्रवारी शीतगृहातील द्राक्षे पाहिली असता, त्यांना पूर्ण तडे गेले असल्याचे दिसून आले. त्यामुळे जोशी यांनी द्राक्षांची निर्यात थांबविल्याचे सांगितले. जोशी यांच्याप्रमाणेच अन्य पाच ते सहा निर्यातदारांनीही द्राक्षांना तडे गेल्यामुळे निर्यात थांबविली आहे. यामुळे खानापूर तालुक्यातील खानापूर, पळशी, हिवरे, बलवडी, तासगाव तालुक्यातील जरंडी, सावळज परिसरातील सात हजार ५०० एकरांतील १५ हजार टन द्राक्षांची निर्यात थांबविली आहे. निर्यातीसाठी बनविलेल्या द्राक्षापासून बेदाणाही बनविता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना निर्यातक्षम द्राक्षे किरकोळ बाजारपेठेतच विकावी लागणार आहेत. युरोपीय बाजारपेठेत ७५ रुपये किलोने विक्री होणाऱ्या या द्राक्षांना किरकोळ बाजारात १५ ते २० रुपये दरही कोणी देत नाही. यामुळे द्राक्षबागायतदार अस्मानी संकटात सापडला आहे. युरोपीयन राष्ट्रांना द्राक्षे पाठवून लाखो रुपये मिळविण्याची स्वप्ने पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरात बागेत फवारणी केलेल्या औषधाचाही खर्च पडण्याची शक्यता नाही. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आहेत. विमा कंपन्यांनीही सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर- अवकाळी पावसाच्या धास्तीने काही शेतकऱ्यांनी द्राक्षबागांचा पीक विमा उतरविला आहे. परंतु, या विमा कंपन्यांनी १५ आॅक्टोबर ते ३० जानेवारी हा कालावधी ठरविला आहे. या कालावधीत पाऊस झाला तरच द्राक्षबागायतदारांना भरपाई मिळते, अन्यथा मिळत नाही. - त्यामुळे मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाची विमा कंपन्यांकडून भरपाई मिळण्याची शक्यता धूसर असल्याचे द्राक्षबागायतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र घुळी यांनी सांगितले. याशिवाय, विमा कंपन्यांचे अन्य जाचक नियमही असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.
शंभर कोटींच्या द्राक्षांची निर्यात थांबली
By admin | Updated: March 7, 2015 00:00 IST