कोल्हापूर : नगरसेवक होण्याचे स्वप्न उराशी घेऊन महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या सर्वपक्षीय उमेदवारांना जिवाचे रान करावे लागत आहे. मतदान होईपर्यंत प्रत्येक उमेदवाराला दररोज सकाळ-संध्याकाळ प्रभागाच्या कमीत कमी चार ते पाच फेऱ्या माराव्या लागणार आहेत. मतदारांशी संपर्क साधण्यात जो कुचराई दाखविल त्याला विजय दुरावण्याची शक्यता जास्त आहे. यासाठी मैदानातील प्रत्येक उमेदवाराला दररोज कमीत कमी दहा किलोमीटर पायी यात्रा करावी लागणार आहे. ऐन आॅक्टोबर हिटमध्ये महापालिकेचा रणसंग्राम भरात आला असून, प्रत्येक प्रभागात प्रचार फेऱ्या, रॅली आणि कार्यक्रमाला जोर आला आहे. आपली उमेदवारी लोकांपर्यंत पोहोचावी. आपली, पक्षाची भूमिका त्यांना कळावी, यासाठी मतदारांपर्यंत वैयक्तिकरीत्या संपर्क साधण्यास सर्वांचे प्राधान्य आहे. यासाठी घर ते घर, अपार्टमेंट, कॉलन्यांमधील प्रत्येक चौकटीपर्यंत पोहोचण्याचे नियोजन केले जात आहे; पण हे करताना उमेदवारांना घाम गाळावा लागत आहे. कारण आधुनिक जमान्यात उठसूट गाड्या घेऊन जाण्याच्या सवयीमुळे अनेकजण जणू चालणेच विसरले आहेत. त्यामुळे थोडे अंतर जरी चालले तरी अनेकांना दम लागत आहे. मग अपार्टमेंटचे जिने चढणे तर दूरच. पण विजयासाठी एक एक मताचे मूल्य असल्याने उमेदवारांना, कार्यकर्त्यांना जीने चढत उन्हातून प्रचार फेरी काढणे म्हणजे एक दिव्यच ठरत आहे. सत्तेसाठी प्रचार करावाच लागणार असल्याने काहींनी हपळ्ीप उन्हाची तिव्रता कमी वाटावी यासाठी ठिकठिकाणी लिंबू सरबत, शीतपेये यांची सोय सोय केली आहे. त्यामुळे प्रचारासाठी कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहण्यास मदत होत आहे. तर काहीजण सोबत गार पाण्याच्या बाटल्या घेत आहेत. कोल्हापूरचा विचार केल्यास सर्वसाधारणपणे ६८ चौरस किलोमीटरमध्ये शहर पसरलेले आहे. यामध्ये ८१ वॉर्ड विभागलेले असून मध्यवर्ती शहरातील काही वॉर्डचा अपवाद सोडल्यास अनेक प्रभाग विस्तृत असे आहेत. सरासरी २ ते ५ चौरस किलोमीटरमध्ये प्रभागाचा विस्तार आहे. यामधील कॉलन्या आणि अपार्टमेंटमधील मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांना शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत. प्रचारासाठी सध्या सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर होत असला तरी पारंपरिक प्रचार फेऱ्यांचे आजही महत्त्व कायम आहे. मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधण्यासाठी प्रचार फेऱ्या सर्वांत उपयोगी ठरतात. प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवशी तरी प्रभागाचा कोपरा आणि कोपरा पादाक्रांत करावा लागणार आहे. या आठवडाभरात जो उमेदवार पायाला चक्रेलावून फिरेल तोच महापालिकेच्या सभागृहात जाणार आहे.
नगरसेवक होण्यासाठी रोज १० कि.मी.ची पायपीट
By admin | Updated: October 24, 2015 01:09 IST