कोल्हापूर : सार्वजनिक उत्सवासह सामूहिक कार्यक्रमात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी समाजाला घातक ठरणाऱ्या गुन्हेगारांना काही कालावधीसाठी जिल्ह्याबाहेरचा रस्ता दाखवण्याची कारवाई होते. ज्यांच्या नावावर गुन्हे आहेत अशांवर हद्दपारीची कारवाई होते. हद्दपारी उत्सव कालावधीपुरती तसेच सहा महिने, वर्षासाठीही केली जाते. अनेक वेळा हे गुन्हेगार हद्दीतून कागदोपत्री हद्दपार असले तरीही ते जिल्ह्यात आढळतात. काही गुन्हेगारांबाबत हद्दपारी नावालाच असते.
कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी समाजात संभाव्य गुन्हेगारीचा धोका विचारात घेऊन प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांबाबत माहिती संकलत करून पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत त्यांच्यावर तालुक्याच्या प्रांत अधिकाऱ्यामार्फत हद्दपारीचा शिक्कामोर्तब केले जाते. पण हद्दपारीनंतरही काही गुन्हेगार हे त्या-त्या जिल्ह्यातच भूमिगत असतात. विशेषत: गणेशोत्सवात हे गुन्हेगार हद्दपार केले जातात. उत्सवाव्यतिरिक्त इतर वेळीही समाजाला घातक ठरणाऱ्या अशा ७० गुन्हेगारांना सहा महिने, वर्षासाठी हद्दपारीचे प्रस्ताव पोलीस अधीक्षकांनी मंजुरीसाठी पाठवले, पण आतापर्यंत त्यातील फक्त नऊ जणांनाच हद्दपार केले, इतरांच्याबाबतचा प्रस्ताव अद्याप निर्णयाविना प्रलंबित आहे.
हद्दपारीच्या कारवाया..
वर्ष : कारवाया
२०१८ : १८८
२०२९ : २१४
२०२० : १०२
२०२१ : ३१८ (सप्टेंबरपर्यंत)
हद्दपारीनंतर जिल्ह्यातच वावरणाऱ्या गुन्हेगारांना बेड्या
हद्दपारीची कारवाई झाल्यानंतरही ज्या गुन्हेगारांचे ‘खाकी’शी लागेबांधे आहेत, असे गुन्हेगार हद्दपारीनंतरही त्याच जिल्ह्यातच भूमिगत राहतात. पण ते सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्यास त्यांना बेड्या ठोकल्या जातात. अशांवर कलम १४२ मुंबई ॲक्टद्वारे पुन्हा नवा गुन्हा दाखल करून कारवाईसाठी न्यायालयासमोर उभे केले जाते. दरवर्षी किमान ८ ते ९ जणाचा हद्दपारीनंतरही जिल्ह्यात वावर असल्याचा कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
हद्दपारी कशासाठी?
गुन्ह्यात चाकूसारखे हत्यार वापरणे, वादावादी करणे, बेकायदा दारूविक्री आदी गुन्हे नावावर असणाऱ्या गुन्हेगारांकडून सार्वजनिक कार्यक्रमात कायदा व सुव्यवस्थेला बाधा येण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा गुन्हेगारांना उत्सव कालावधी अथवा सार्वजनिक कार्यक्रमापुरते हद्दपार केले जाते. त्याशिवाय खून, खुनाचे प्रयत्न, हाणामारी, आदी वारंवार गुन्हे घडणाऱ्या सराईत गुन्हेगाराकडून समाजाला संभाव्य धोका विचारात घेऊन अशा गुन्हेगारांना सहा महिने अगर काही वर्षांसाठी हद्दपार केले जाते. त्यामुळे सार्वजनिक शांतता राखण्यास मदत होते.
कोट...
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, त्या गुन्हेगारांकडून पुन्हा गुन्हेगारी कृत्य होऊ नये. उत्सवासारखे सार्वजनिक कार्यक्रम सुरळीत व्हावेत यासाठी गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई केली जाते. गेल्या दोन वर्षांत गुन्हेगारांची हद्दपारी केली असली तरीही कोरोना आणि महापुरामुळे कारवाईत मर्यादा आल्या.
- शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा