येथील ताराबाई पार्क परिसरातील ईएसआयसी रुग्णालयात गेल्या वर्षी जूनमध्ये ५० बेडचा अलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला. पण, त्यासाठी रुग्ण पाठविण्याची वेळ प्रशासनावर आली नाही. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून ईएसआयसीकडून ३० बेडचे दोन वॉर्डमध्ये नॉन कोविड विमाधारक कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना ॲॅडमिट करून घेण्याची वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आली. या दोन्ही वॉर्डमध्ये दर महिन्याला सरासरी ५० रूग्ण ॲॅडमिट होतात. त्यात हदयविकार, दमा, मधुमेह, बऱ्या न होणाऱ्या जखमा असणारे रुग्ण, लहान मुले आणि गरोदर महिलांचा समावेश आहे. एक ते दहा दिवसांपर्यंत रुग्णांना ॲडमिट केले जाते. बाह्यरुग्ण विभागामध्ये (ओपीडी) रोज दोनशे रुग्ण औषधोपचार घेतात. कोरोनाच्या कालावधीत नॉन कोविड विमाधारक कामगार रुग्णांना अन्य रुग्णालयात सेवा घेणे अडचणीचे ठरत आहे. अशा रुग्णांसाठी ईएसआयसीची सेवा आधार ठरत आहे.
चौकट
तर, विमाधारक कामगारांची अडचण होणार
दरमहा विमाधारक कामगार आणि उद्योजकांकडून ईएसआयसीची वर्गणी जमा होते. त्यामुळे या कामगारांना प्राधान्याने सेवा देणे आम्हाला आवश्यक आहे. त्यांच्या ऐवजी अन्य रुग्णांना सेवा दिल्यास या विमाधारक कामगारांची अडचण होणार आहे. कोविडबाबतचे उपचार, सेवा देण्याबाबत आम्हाला अद्याप ईएसआयसीच्या दिल्लीतील मुख्यालयातून कोणतीही सूचना मिळालेली नाही. कोविडचे रुग्ण वाढल्यास आवश्यक सेवा देण्याची आमची तयारी आहे. पण, त्यासाठी ऑक्सिजन, औषधे, पीपीई किट, रुग्णवाहिका, पुरेसे मनुष्यबळ राज्य शासनाने उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे या ईएसआयसी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र पवार यांनी सोमवारी सांगितले.