अतुल आंबी - इचलकरंजी -रस्त्यावर असलेली फेरीवाल्यांची व किरकोळ विक्रेत्यांची अतिक्रमणे, खड्डे पडलेले रस्ते आणि उडणारी धूळ यामुळे वस्त्रनगरीस भकास शहराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दररोज दीड लाखांहून अधिक वाहने या रस्त्यांवरून फिरत असल्याने पादचारीसुद्धा छोट्या-मोठ्या अपघातांत बळी पडत आहेत. अतिक्रमणविरहित, खड्डे नसणारे चकचकीत आणि नागरिकांना भयमुक्त संचार करता येणारे रस्ते पाहायला मिळतील का, असाच प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.कबनूर ते जय सांगली नाका आणि पंचगंगा फॅक्टरी ते नदीवेस नाका हे मुख्य रस्ते म्हणजे इचलकरंजीच्या प्रमुख रक्तवाहिन्या आहेत. मात्र, या रस्त्यांवर एएससी कॉलेज, शाहू पुतळा चौक, यशवंत प्रोसेसर्स, शिवाजी पुतळा चौक, मध्यवर्ती बसस्थानक, जनता चौक, जुनी नगरपालिका, महात्मा गांधी पुतळा चौक, मोठे तळे, राजवाडा चौक, जुना सांगली नाका चौक, बीग बझार, जय सांगली नाका, डेक्कन स्पिनिंग मिलसमोर, उत्तम-प्रकाश थिएटर, मरगुबाई मंदिर चौक अशा विविध ठिकाणी फेरीवाले, किरकोळ विक्रेते, रिक्षास्थानक, आदींची अतिक्रमणे आहेत. त्याचबरोबर सातत्याने गर्दी असलेल्या ठिकाणी-चौकात दुचाकी वाहनांच्या पार्किंगमुळे तेथील रस्ते निमुळते होतात.शहरात वरील ठिकाणी असलेल्या बॅँका, दुकाने, वेगवेगळी कार्यालये यांच्याकडे स्वतंत्र पार्किंगची सोय नाही. त्यांनी दाखविलेली पार्किंगची जागा बेपत्ता होते आणि तेथेही दुकाने व कार्यालये थाटली जातात. त्यामुळे त्या संस्थांची स्वत:ची वाहने आणि त्यांच्याकडे येणारी चारचाकी-दुचाकी वाहने रस्त्यांवर लावली जातात. वास्तविक पाहता पार्किंग दाखविलेल्या इमारतींवर कारवाई करण्याची जबाबदारी नगरपालिका पार पाडत नाही आणि वाहतूक नियंत्रक पोलिसांची क्रेन रस्त्यावरील काही दुचाकी वाहने उचलण्याचा फार्स करते; पण ही क्रेन चारचाकी वाहनांवर कारवाई का करीत नाही? याचे उत्तर सर्वसामान्यांना कधीच मिळालेले नाही. वाहतूक नियंत्रणासाठी असलेले पोलीस ‘केसेस’ करण्यावर अधिक भर देतात. त्यांना दिलेले ‘टार्गेट’ पूर्ण करण्यातच त्यांना अधिक धन्यता वाटते; पण गर्दीची ठिकाणे व गर्दीची वेळ माहीत असूनही त्याठिकाणी वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचे काम का करीत नाहीत, हासुद्धा एक अनुत्तरित प्रश्न भाबड्या जनतेला वारंवार विचारावासा वाटतो. (क्रमश:)फेरीवाल्यांची दादागिरीइचलकरंजीत तर फेरीवाले गाड्यांचा सुकाळ आहे. प्रामुख्याने फळफळावर विक्री करणारे फेरीवाले वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी रस्त्यावर व चौकात ठाण मांडून उभे आहेत. मोक्याच्या ठिकाणी ‘दादागिरी’ असलेल्या विक्रेत्यांची रहदारीला सातत्याने अडचण होते, हे माहीत असूनही नगरपालिका व पोलीस त्यांच्यावर कारवाई करीतच नाहीत, याचेच आश्चर्य नागरिकांना वाटते आहे. मूठभर विक्रेत्यांसाठी जनतेला वेठीस धरले जात असल्याची संतप्त भावना वाहनधारकांत व पादचाऱ्यांमध्ये आहे.ट्रॅफिक सिग्नलकडे दुर्लक्षकोट्यवधींची कामे पार पाडण्यामध्ये पालिकेतील लोकप्रतिनिधी व प्रशासन नेहमीच लक्ष पुरविते; पण शहरात राजवाडा चौक, जनता चौक, बंगला रोड या ठिकाणच्या ट्रॅफिक सिग्नलची दुरुस्ती करून ते कार्यरत होत नाहीत. नवीन ट्रॅफिक सिग्नलची उभारणी करण्यासाठी पालिका लक्ष देत नाही, याचीच खंत नागरिकांना वाटत आहे.
अतिक्रमण, खड्ड्यांंमुळे घुसमट
By admin | Updated: November 11, 2014 00:06 IST