पारंपरिक अभ्यासक्रमांच्या तुलनेत या पदविका अभ्यासक्रमाच्या शिक्षणाचा खर्च कमी आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अभियांत्रिकी पदवीच्या शिक्षणाचा पाया भक्कम होण्यास मदत होते. जिल्ह्यात २० पॉलिटेक्निक आहेत. त्यांच्या माध्यमातून शिवाजी उद्यमनगर, शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले पंचतारांकितसह अन्य औद्योगिक वसाहतींना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होते. कोणताही पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी अथवा स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यास पूरक सुविधा, वातावरण कोल्हापूरमध्ये आहे. कोरोनामुळे रोजगाराभिमुख शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढल्याने यावर्षी पॉलिटेक्निककडील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे.
जिल्ह्यातील प्रवेश क्षमता
एकूण पॉलिटेक्निक : २०
एकूण प्रवेश क्षमता : ६५००
प्रवेश अर्ज : ५५८३
शासकीय पॉलिटेक्निक : १
प्रवेश क्षमता : ७००
अनुदानित पॉलिटेक्निक : १
प्रवेश क्षमता : १४०
खासगी पॉलिटेक्निक : १८
प्रवेश क्षमता : ५६६०
संगणक, इलेक्ट्रिकलकडे ओढा
गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे विविध क्षेत्रात ऑनलाईन, डिजिटलचे महत्त्व वाढले आहे. भविष्याचा वेध घेत अनेक विद्यार्थ्यांनी संगणक, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला प्राधान्य दिले आहे. त्यापाठोपाठ मेकॅनिकल,सिव्हील, आदी अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले जात आहे. गेल्यावर्षी सुमारे चार हजार अर्ज दाखल झाले होते. यंदा त्यामध्ये वाढ झाली असल्याचे शासकीय तंत्रनिकेतनमधील प्रवेश प्रक्रिया समन्वयक एम. एस. कागवाडे यांनी सांगितले.
म्हणून पॉलिटेक्निकला पसंती
विमानाचा मेकॅनिक होण्याचे लहानपणापासूनचे माझे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी पॉलिटेक्निकला मी प्रवेश घेत आहे.
-शंभूराज भोसले, कसबा बावडा
रोजगार, कौशल्याभिमुख शिक्षण यापुढे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आयटी, ईएनटीसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा मी अर्ज भरला आहे.
-अथर्व भोसले, पापाची तिकटी परिसर
प्राचार्य म्हणतात
पॉलिटेक्निकमधील तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतात. त्यादृष्टीने कोल्हापुरातील वातावरण देखील पोषक असल्याने पॉलिटेक्निककडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. यावर्षी प्रवेशाबाबतचे चित्र चांगले आहे.
-डॉ. महादेव नरके, प्राचार्य, डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक, कसबा बावडा.
तांत्रिक शिक्षणाचे समजलेले महत्त्व आणि शिक्षणाचा कमी खर्च, रोजगाराच्या अधिक संधी असल्याने पॉलिटेक्निकमधील प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.
-विनय शिंदे, प्राचार्य, न्यू पॉलिटेक्निक, उचगाव.
160921\16kol_1_16092021_5.jpg
डमी (१६०९२०२१-कोल-डमी ११८७)