राजाराम पाटील -- इचलकरंजीवर्षभर असलेले आर्थिक मंदीचे सावट आणि ५२ दिवस चाललेला सायझिंग कामगारांचा संप यामुळे वस्त्रनगरीच्या कापड उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी, यंत्रमाग क्षेत्राबरोबर सायझिंग-वार्पिंग, प्रोसेसिंग उद्योगातील सुमारे ७५ हजार कामगारांच्या बोनस रकमेत सरासरी ३० टक्क्यांची घट होणार असल्यानेकामगार वर्गात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. तसेच आगामी हंगामासाठी कापडाची मागणी नसल्याने कापड उत्पादक यंत्रमागधारक आणि व्यापारीसुद्धा चिंतेत आहेत.इचलकरंजी परिसरामध्ये दीड लाख यंत्रमाग असून, त्यावर सुमारे ५५ हजार कामगार कार्यरत आहेत. याचबरोबर सायझिंग-वार्पिंग उद्योगात साडेतीन हजार, प्रोसेसर्स उद्योगात तीन हजार आणि सूतगिरण्यांमध्ये दोन हजार असे कामगार आहेत. अशा यंत्रमाग उद्योगामध्ये यंत्रमाग कामगार, जॉबर, कांडीवाला, कापड तपासणीस-घडीवाला, दिवाणजी असे कामगार असतात; तर सायझिंगमध्ये सायझर्स, बॅक सायझर्स, वार्पर, हेल्पर, फायरमन आणि प्रोसेसिंग उद्योगामध्ये कामगारांबरोबरच पॅकिंग विभागात काम करणारे कामगार, तसेच कार्यालयीन कर्मचारी कार्यरत असतात. यंत्रमाग क्षेत्रातील कामगारांना दहा हजारांपासून ते पंचवीस हजारांपर्यंत बोनसची रक्कम मिळते. सायझिंग उद्योगामध्ये वीस ते पंचवीस हजार रुपये, प्रोसेसिंग उद्योगामध्ये सुमारे दहा ते पंधरा हजार रुपये आणि सूतगिरण्यांसाठी दहा ते वीस हजार रुपये असा कामगारांच्या वर्गवारीनुसार बोनस मिळतो. मात्र, गेल्या वर्षभरात कापड उद्योगात जागतिक व देशांतर्गत स्तरावर अभूतपूर्व मंदीचे वातावरण आहे. याचा परिणाम म्हणून कापडास असलेली मागणी घटली आहे. त्यामुळे कापडाच्या किमती कमी होण्याबरोबरच यंत्रमाग व आॅटोलूम क्षेत्रासाठी मिळणारा जॉब रेट घटला आहे आणि वस्त्रोद्योगात आर्थिक मंदी जाणवत आहे.मंदीच्या वातावरणामुळे कापडाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यातच किमान वेतनाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी २१ जुलैपासून सुरू झालेला सायझिंग-वार्पिंग कामगारांचा संप ५२ दिवस चालला. याचा अनिष्ट परिणाम यंत्रमाग कापडाच्या उत्पादनावर झाला आहे. एकूणच मंदीमुळे आणि संपामुळे कापडाचे उत्पादन तीस ते पस्तीस टक्क्यांनी घसरले. वस्त्रनगरीत कापडाच्या उत्पादनाशी निगडित कामगारांचे वेतन व वेतनाच्या टक्केवारीवर दीपावली बोनस मिळत असल्याने बोनस रकमेतसुद्धा सरासरी तीस टक्क्यांनी घट होणार आहे. हंगामी कापडाची मागणी नाहीप्रत्येक वर्षी लग्नसराईच्या हंगामासाठी कापडाची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत असते. त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कापडाची मागणी वाढत असते; पण यंदा जागतिक मंदी व राज्यात असलेला दुष्काळ यामुळे दीपावली सणानंतर होणाऱ्या कापडाच्या खरेदीचा कोणताही कार्यक्रम बड्या व्यापाऱ्यांकडून मिळालेला नाही. याचा परिणाम म्हणून दीपावली सणासाठी बंद झालेले कारखाने नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत बंदच राहतील, अशीही चर्चा शहरातील कापड बाजारात आहे.
यंत्रमाग कामगारांच्या बोनसला कात्री
By admin | Updated: October 30, 2015 23:26 IST