डी. वाय. पाटील ग्रुपच्या या हॉटेलने कोल्हापूरच्या हॉटेल संस्कृतीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. अत्याधुनिक सुविधांसह स्वच्छताविषयक निकषांचे काटेकोर पालन व ग्राहकांच्या आरोग्याची काळजी यावर व्यवस्थापनाचा नेहमीच भर राहिला आहे. याच कामाची पोहोचपावती या यशामुळे मिळाली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य व घनकचरा विभागाकडून शहरातील हॉटेल्ससाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
महापालिका अधिकाऱ्यांबरोबरच दिल्ली व अन्य शहरांतील सदस्यांच्या पथकाने या स्पर्धेचे परीक्षण केले. हॉटेलमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी सयाजी हॉटेल व्यवस्थापनाकडून कम्पोस्टिंग मशीन बसविण्यात आली आहे. त्यामुळे दररोजच्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाते. स्वच्छतेबरोबरच ग्राहकांच्या आरोग्याचीही हॉटेल कर्मचाऱ्यांकडून विशेष काळजी घेतली जाते. याची दखल घेऊन समितीने या स्पर्धेत हॉटेल सयाजीची प्रथम क्रमांकासाठी निवड केली आहे.
महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून शहरातील सर्वांत स्वच्छ हॉटेल म्हणून निवड झाल्याबाबतचे प्रमाणपत्र नुकतेच प्रदान करण्यात आले आहे. या स्पर्धेत २०१९ मध्येही हॉटेल सयाजीने प्रथम स्थान मिळविले होते. या यशाबद्दल डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी हॉटेल व्यवस्थापन, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.