चौदाव्या वित आयोगाच्या निधीच्या भ्रष्टाचारावरून गाजलेल्या देवाळे, ता. करवीर येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गेल्या निवडणुकीत ग्रामपंचायत सत्तेसाठी एकमेकांविरुद्ध लढलेल्या मातब्बर नेत्यांनी या निवडणुकीत मात्र एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; परंतु महाविकास आघाडीच्या विरोधात स्वामी समर्थ शेतकरी विकास आघाडीने शड्डू ठोकून आठ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केल्याने आठ जागांसाठी सोळा उमेदवार उभे आहेत. मातब्बर मंडळींच्या विरोधात सर्वसामान्य कार्यकर्त्यांची झुंज लागल्याने या लढतीकडे परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.
महाविकास आघाडीचे नेतृत्व भोगावती साखर कारखान्याचे संचालक एस.ए. पाटील, प्रा. निवास पाटील, वसंतराव पाटील करत असून, विरोधी गटाच्या श्री स्वामी समर्थ स्वाभिमानी शेतकरी विकास आघाडीचे नेतृत्व विकास पाटील करत आहेत, तर या निवडणुकीत माजी सरपंच दीपक सुतार यांची पत्नी माधुरी सुतार या बिनविरोध झाल्या आहेत.