कोल्हापूर : शिये टोलनाक्याजवळ दुचाकीच्या आडवे कुत्रे आल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार, तर एकजण जखमी झाला. दीपक राजाराम जांभळे (वय ३४, रा. नेर्ले, जि. सांगली) असे ठार झालेल्याचे, तर विशाल वसंत पोवार (२८, रा. कुंडल, ता. पलूस) असे जखमीचे नाव आहे. आज, शनिवारी रात्री हा अपघात झाला. शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक जांभळे व विशाल पोवार हे आज कामानिमित्त कोल्हापुरात आले होते. कोल्हापुरातील काम आटोपून रात्री शिये फाट्यामार्गे गावी जात असताना शिये टोलनाक्याजवळ त्यांच्या दुचाकीच्या आडवे कुत्रे आल्याने दोघेही दुचाकीवरून रस्त्यावर पडले. या अपघातामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती प्रवाशांनी १०८ रुग्णवाहिकेला कळविली. या रुग्णवाहिकेतून त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये आणले. या ठिकाणी दीपक जांभळे यांच्यावर उपचार सुरू असताना ते मृत झाले, तर विशालना उपचारासाठी राजारामपुरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दीपक जांभळे हे शेती करीत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. या घटनेची माहिती कळताच त्यांच्या मित्र-मंडळींनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती.
कुत्रे आडवे आल्याने दुचाकीला अपघात
By admin | Updated: November 30, 2014 01:00 IST