संदीप बावचे - शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्याला पर्याय देण्यासाठी कर्नाटकातील हिप्परगी धरणाचा पॅटर्न वापरून हायड्रोलिक (स्वयंचलित) पद्धतीचा बंधारा उभारण्यासाठी हालचाली झाल्या होत्या. हायड्रोलिक पद्धतीच्या बंधाऱ्याचे डिझाईन (रेखाचित्र) करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून नाशिक येथील कंपनीकडे आराखडा पाठविण्यात आला आहे. तब्बल अडीच वर्षे उलटले तरी याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसून, हायड्रोलिक बंधाऱ्याचा आराखडा नाशिकमध्ये अडकला आहे.तालुक्यातील २२ गावांना गेल्या ३५ वर्षांपासून बंधाऱ्याच्या बॅकवॉटरचे पाणी नागरिकांना जीवनदायी, तर शेतकऱ्यांना वरदान ठरले आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे बहुतांशी दगड निखळून गेल्याने बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते. ऐन उन्हाळ्यात पाणी गळतीमुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. बंधाऱ्याची तात्पूर्ती दुरुस्ती होत असली तरी ३५ वर्षे पूर्ण झालेला बंधारा कितपत टिकणार, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. सध्या असलेला बंधारा कोल्हापूर पद्धतीचा आहे. ही संकल्पना आता कालबाह्य झाल्याने आधुनिक यांत्रिकी (हायड्रोलिक) पद्धतीचा बंधारा उभारण्यासाठी पाटबंधारे विभागाने अडीच वर्षांपूर्वी हालचाली सुरू केल्या होत्या. कर्नाटक हद्दीतील हिप्परगी पॅटर्नप्रमाणे राजापूरचा बंधारा उभारण्यासाठी हायड्रोलिक पद्धतीच्या बंधाऱ्याचे नियोजन करण्यात आले. याचे डिझाईन (रेखाचित्र) करण्यासाठी नाशिक येथील कंपनीकडे त्याचा आराखडा पाठविण्यात आला होता. डिझाईन मंजुरीनंतर या बंधाऱ्यासाठी खर्च किती अपेक्षित आहे, हे समजणार होते. त्यानंतर असा बंधारा उभारण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात येणार होता. अशा पद्धतीच्या स्वयंचलित बंधाऱ्यामुळे दरवर्षी बरगे घालण्याचा जो प्रश्न निर्माण होतो, तो कायमस्वरूपी मिटावा या हेतूनेच सध्या अस्तित्वात असलेल्या बंधाऱ्याला पर्याय देण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र, तब्बल अडीच वर्षांचा कालावधी उलटला तरी याबाबतची कोणतीही कार्यवाही अजूनपर्यंत झालेली दिसत नाही.रेखाचित्र तयार : माहिती कागदावरचतत्कालीन आमदार स्व. डॉ. सा. रे. पाटील यांनी वेळोवेळी पुढाकार घेऊन शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या मागणीनुसार राजापूर बंधाऱ्याला पर्याय म्हणून हायड्रोलिक पद्धतीचा बंधारा उभारण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून हालचाली झाल्या होत्या. दरम्यान, नाशिक येथील कंपनीकडून राज्यातील बंधाऱ्यांची रेखाचित्रे (डिझाईन) तयार केली जातात. राजापूर बंधाऱ्याचेही रेखाचित्र करण्यासाठी माहिती पुरविण्यात आली आहे, ती कागदावरच राहिली आहे.
नाशिकमध्येच अडकला स्वयंचलितचा आराखडा
By admin | Updated: December 29, 2015 01:06 IST