जयसिंगपूर : कोरोनाची महामारी आल्याने अगोदरच ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक लांबली. त्यानंतर सरपंच आरक्षणाचे प्रकरण न्यायालयात गेल्याने शिरोळ तालुक्यातील सरपंच व उपसरपंच निवडणूक लांबल्याचे चित्र आहे. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना सरपंच, उपसरपंच पदाच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. शिरोळ तालुक्यात ५२ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. ९ फेब्रुवारीला सरपंच व उपसरपंच निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला होता. मात्र, तालुक्यातील शिरटी व मजरेवाडी येथील चुकीचे आरक्षण टाकल्याच्या तक्रारी न्यायालयात दाखल झाल्यानंतर सरपंच, उपसरपंच निवडीला स्थगिती मिळाली आहे. १६ फेब्रुवारीपर्यंत सुनावणी घेऊन निर्णय घेण्याबाबत न्यायालयाने आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी प्रक्रियादेखील पूर्ण झाली असून याबाबतच्या निकालाकडे सर्वच सदस्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सहलीला गेलेले सदस्य गावाकडे परतले आहेत. एकूणच सरपंच निवडणुकीचा कार्यक्रम लांबणीवर पडल्याने सर्वांचीच घालमेल वाढली आहे.
शिरोळ तालुक्यात सरपंचपदाची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:23 IST