कोल्हापूर : करवीर आणि गगनबावडा येथील शाहू सुविधा केंद्र (सेतू) चालविण्यास ठेकेदार झेनिथ सॉफ्टवेअर लि. कंपनीने मंगळवारी असमर्थता व्यक्त केली. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना पत्र पाठवून तसे कळविले आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत असणाऱ्या शाहू केंद्रात नागरिकांना योग्य वेळेत दाखले मिळत नसल्याचे कारण देत करवीर तहसीलदार योगेश खरमाटे यांनी शुक्रवारीच हे केंद्र सील केले होते. अडीच वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने ‘बीओटी तत्त्वा’वर जिल्ह्यात दहा ठिकाणी शाहू सुविधा केंद्र चालविण्याचा ठेका झेनिथ सॉफ्टवेअर कंपनीला दिला होता. सुरुवातीचे काही वर्षे हे काम कंपनीने चांगल्या प्रकारे केले होते परंतु नंतर त्यांच्या कामकाजाबद्दल प्रचंड तक्रारी येऊ लागल्या. त्याची दखल घेत कंपनीला करवीर तहसीलदार खरमाटे यांनी नोटीस बजावली होती. करवीरचे प्रांत प्रशांत पाटील यांनीही कंपनीला पंचवीस लाखांचा दंड केला होता तरीही त्यांच्या कामात सुधारणा झाली नाही. शेवटी करवीर तहसीलदार खरमाटे यांनी शुक्रवारी शाहू सुविधा केंद्र सील केले होते. मंगळवारी कंपनीचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर महेश कबाडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांना पत्र लिहून करवीर व गगनबावडा येथील केंद्र चालविण्यास असमर्थ असल्याचे सांगून जबाबदारी झटकली आहे. (प्रतिनिधी)
‘सेतू’ चालविण्यास नकार
By admin | Updated: July 22, 2015 00:40 IST